स्फोटामुळे भिंत पडून पती-पत्नीसह तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:23 AM2017-10-22T01:23:00+5:302017-10-22T01:23:00+5:30
मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक कशाचा तरी स्फोट होऊन पतीपत्नीसह अन्य एक महिला असे तीन जण ठार झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक कशाचा तरी स्फोट होऊन पतीपत्नीसह अन्य एक महिला असे तीन जण ठार झाले. स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळ हादरले. मैत्रीण महिला आणि पती- पत्नी यांनी संपत्तीच्या वादातून जाळून घेतले आणि त्याच वेळी घराची भिंत पडल्याचा दावा या घटनेसंदर्भात मुकुंदवाडी पोलिसांनी केला.
शारदा भावले (५०, रा. राजीव गांधीनगर), सूर्यभान कचरू दहीहंडे (५५) आणि सुमन दहीहंडे (५०,दोघेही रा. बजाजनगर) अशी मयतांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी सांगितले की, सूर्यभान आणि सुमन हे बजाजनगरमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शारदासोबत सूर्यभान यांचे मैत्रीचे संबंध होते.
शारदा यांना घर खरेदी करण्यासाठी सूर्यभानने पैसे दिले होते. शुक्रवार दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास दहीहंडे पती-पत्नी राजीव गांधीनगरातील शारदाच्या घरी गेले. घर नावे करून देण्याच्या मागणीवरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी स्वयंपाकाच्या खोलीत अचानक कशाचा तरी स्फोट झाला. या घटनेत त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि तिघेही गंभीररीत्या जळाले. या घटनेत शारदा घटनास्थळीच ठार झाली तर दहीहंडे पती-पत्नी गंभीर जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत शारदा, जखमी सुमन आणि सूर्यभान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे सूर्यभान यांचा आणि त्यांची सुमन यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी दिली.
जबाब नोंदविता आला नाही
घटनेनंतर गंभीर जखमी पती-पत्नींचा जबाब शुक्रवारी पोलिसांना घेता आला नाही.
नंतर उपचारदरम्यान पती पत्नीचा मृत्यू झाल्याने जबाब नोंद करण्यात आले नाही यामुळे घरामध्ये तिघांमध्ये नेमके काय घडले, याबाबत अचूक माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे करीत आहेत.
...अन् शवविच्छेदन पंचनामा केला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी
स्फोटात गंभीररीत्या भाजल्यानंतर दहीहंडे पती- पत्नी रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अपघात विभागातील डॉक्टरांना सांगितलेल्या नाव आणि पत्त्याच्या आधारे घाटी पोलीस चौकीच्या पोलिसांनी ही घटना बजाजनगर येथे घडल्याचे समजून या घटनेची एमएलसी एमआयडीसी वाळूज पोलिसांना पाठविली आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनीही घटनास्थळाची शहानिशा न करता मृत सूर्यभान दहीहंडे आणि सुमन दहीहंडे यांचे शवविच्छेदनपूर्व पंचनामा केला. घाटीत दोन्ही शवांचे विच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय साईनाथ गीते यांना विचारले असता ही तांत्रिक चूक असल्याचे ते म्हणाले.