वाळूज उद्योगनगरीत ३ गोदाम आगीत भस्मसात; ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:13 PM2023-02-01T20:13:47+5:302023-02-01T20:14:28+5:30
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
- मेहमूद शेख
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत आज सांयकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तीन गोदामांना अचानकआग लागली होती. या आगीत तिन्ही गोदामातील जवळपास ५० ते ६० लाखो रुपये किमंतीचे साहित्य भस्मसात झाले आहे.
वाळूज एमआयडीसीतील सी-सेक्टरमधील प्लॉट क्रमांक सी-२५२ मध्ये मोहम्मद आरिफ हुसैन पटणी (रा.औरंगाबाद) यांचे स्वास्तिक ट्रॉन्सपोर्टचे गोदाम व कार्यालय आहे. आज बुधवारी सांयकाळी ४.३० वाजेच्या सुमारास या ट्रॉन्सपोर्टच्या गोदामात अचानक आग लागली. आग लागल्यामुळे या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोदामातील प्लॉस्टिक व इतर मटेरियल्सने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुपधारण केले. काही वेळातच बाजूच्या वल्लभ ट्रेडर्स व पार्थ एंटरप्रायजेस या बॅटरीच्या गोदामांलाही आगीने वेढले. दरम्यान, माहिती मिळताच वाळूज येथील दोन अग्निशमन बंबानी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्नीशमन अधिकारी पी.के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक हातवटे, एसबी.महाले, के.टी. सुर्यवंशी, सी.एस.पाटील, एस.बी.उखरे, वाय.डी.काळे, एस.बी.शेंडगे यांनी एक ते दिड तासांत आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान
या आगीत स्वास्तिक ट्रॉन्सपोर्टमधील विविध कंपन्याचे मटेरियल्स जळून भस्मसात झाले असून आगीत जवळपास १५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज ट्रॉन्सपोर्टचे मोहम्मद पटणी यांनी केला आहे. वल्लभ ट्रेडर्सच्या गोदामातील ईन्व्हर्टर, सोलार पॅनल आगीत सापडून १५ ते २० लाखाचे नुकसान झाल्याचे प्रशांत दौलताबादकर यांचे म्हणणे आहे. तर पार्थ इंटरप्रायजेसच्या गोदामातील बॅटरी, सोलार पॅनल, सोलार युपीएस आदीसह फर्निचर व इतर साहित्य जळून जवळपास २० लाखाचे नुकसान झाल्याचे पुनम दौलताबादकर यांनी सांगितले. या तीन्ही गोदामात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज गोदाम मालकांनी वर्तविला आहे.