साताऱ्यात ३ कि.मी. ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण; दिवाळीनंतर योजनेला आणखी गती मिळणार
By मुजीब देवणीकर | Published: November 7, 2023 12:32 PM2023-11-07T12:32:52+5:302023-11-07T12:33:13+5:30
सातारा-देवळाई परिसराचा २०१६ मध्ये महापालिकेत समावेश झाल्यानंतर या भागात कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या.
छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाई भागात ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामाला दिवाळीपूर्वीच सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ३ किमी ड्रेनेजलाइनही टाकण्यात आली. प्रत्येक ठिकाणी चेंबरही तयार केले जात आहेत. वर्षभरात २५० किमी ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी दिली.
सातारा-देवळाई परिसराचा २०१६ मध्ये महापालिकेत समावेश झाल्यानंतर या भागात कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या. मागील ६ ते ७ वर्षांत रस्ते बऱ्यापैकी तयार झाले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेत ७० टक्के भागात जलवाहिन्यासुद्धा टाकण्यात आल्या. या भागात ड्रेनेजलाइनचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यासाठी नागरिकांकडून ओरडही सुरू होती. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता आर. एन. संधा आणि उपअभियंता अनिल तनपुरे यांनी प्रथम आराखडा तयार केला. केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत प्रकल्पाला मंजुरीही मिळविली. यश इनोव्हेशन प्रकल्प सल्लागार संस्थेने २७५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. शासन मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवली. अहमदाबाद येथील अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची २३६ कोटी रुपयांची निविदा अंतिम करून या कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. २५० किलोमीटर अंतरावर ड्रेनेजलाइन टाकण्यात येणार आहे. कंत्राटदार कंपनीने अगोदर सर्वेक्षण केले. अनेक ठिकाणी मार्किंगही करण्यात आली.
चार प्रकारच्या लाइन टाकणार
बायपासच्या मुख्य रस्त्यावर ६०० मिमी व्यासाची, सातारा-देवळाईतील रस्त्यावर ४०० मिमी, अंतर्गत मुख्य रस्त्यावर ३०० मिमी व्यासाची आणि वसाहतीमध्ये ड्रेनेजलाइन जोडण्यासाठी १५० मिमी व्यासाची ड्रेनेजलाइन टाकण्यात येणार आहे.