आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:34 PM2022-08-12T12:34:02+5:302022-08-12T12:35:33+5:30
आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ९ लाख ८० हजार सभासद शेतकऱ्यांपैकी ३ लाख २२ हजार शेतकरी सभासदांना आजवर पीककर्ज मिळालेले नाही. विभागात ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून ८० टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. ओल्या दुष्काळाच्या दिशेने जाणारे वातावरण असताना पूर्ण १०० टक्के सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज अद्याप वाटप झाले नसल्याचे विभागीय अहवालातून समोर आले आहे.
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख २९ हजार ८३९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यातील ६ लाख ५७ हजार ५७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. आजपर्यंतच्या पावसाने विभागातील सुमारे साडेचार लाख हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ७ लाख शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे. दुहेरी संकटांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच शासनाकडून अद्याप कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५८५ शेतकरी सभासद आहेत. जालन्यात १ लाख ३ हजार ५२९, परभणी जिल्ह्यात ७१५४९, हिंगोलीत ६७१५१, लातूरमध्ये २ लाख १६ हजार ८६६ तर उस्मानाबादमध्ये ९५१३२, बीडमध्ये १ लाख ३९ हजार ९०९, नांदेडमध्ये १ लाख ४७ हजार ५३६ शेतकरी सभासद आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कमी पीककर्ज वाटप झाले आहे. सर्वाधिक कर्जवाटप नांदेड जिल्ह्यात झाले आहे.
जिल्हानिहाय पीककर्ज वाटप असे
औरंगाबाद : ६१ टक्के
जालना : ५५ टक्के
परभणी : ४० टक्के
हिंगोली : ५० टक्के
लातूर : ६५ टक्के
उस्मानाबाद : ५२ टक्के
बीड : ५८ टक्के
नांदेड : ७० टक्के
एकूण : ५८ टक्के