औरंगाबाद महानगरपालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:42 PM2018-06-25T18:42:38+5:302018-06-25T18:43:19+5:30
महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मनपाच्याच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने एका तरूणाला तब्बल ३ लाख १५ हजारांचा गंडा घातला.
औरंगाबाद : महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मनपाच्याच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने एका तरूणाला तब्बल ३ लाख १५ हजारांचा गंडा घातला. विशेष म्हणजे दीड वर्षापासून याप्रकरणी जवाहरनगर पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत होते.
मनोहर नारायण भवरे (४१, रा.गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील हनुमाननगरातील रहिवासी दुधागिरी संभाजी नगारे हे पदवीधर आहेत. त्यांचे वडील गारखेड्यात दुकान चालवितात. आरोपी मनोहर भवरे हा महानगरपालिकेचा कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपीने तक्रारदारांची भेट घेतली. मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याने तुम्हाला मनपात नोकरी लावू शकतो, असे सांगितले. त्यासाठी तीन लाखांची मागणी केली.
त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आरोपीला तब्बल ३ लाख १५ हजार रूYपये दिले. पैसे हातात पडल्यानंतर आरोपीने नगारे यांना नोकरीचे चक्क बनावट नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन ते महानगरपालिकेत रूजू होण्यासाठी गेले असता, त्यांच्याकडील नियुक्तीपत्र बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले आणि रूजू करून घेण्यास नकार दिला. नगारे यांनी आरोपीला गाठून याविषयी जाब विचारला तेव्हा सध्या रूजू होण्यास जाऊ नका, असे त्याने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा नगारे मनपा कार्यालयात गेले असता त्यांना रूजू करून घेतले नाही. नगारे यांनी आरोपीला गाठून ३ लाख १५ हजार रूपये परत मागितले. आरोपीने त्यांना वेगवेगळे धनादेश दिले. परंतु धनादेश वटलेच नाहीत. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच नगारे यांनी प्रथम जवाहरनगर पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जानुसार आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीही केली.