‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 06:07 AM2024-08-03T06:07:11+5:302024-08-03T06:08:33+5:30
योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्नशील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. कितीही अपप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यावर ३ हजार रुपये टाकणार आहे. ज्या महिलांनी ० बॅलेन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ १०० रुपये टाकणार आहे. त्यानंतर दोन महिन्याचे ३,००० रुपये जमा केले जातील. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली.
राज्य महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमासाठी जमलेली महिलांची गर्दी बघून मुख्यमंत्री त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याही यावेळी उपस्थित होत्या.
विरोधकांना भीती
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे. पण, ही योजना सुरू करण्यासाठी मी एक वर्षांपासून प्रयत्न करतोय. एक वर्षांपूर्वी निवडणुका होत्या का? योजना बंदी व्हावी म्हणून विरोधकांनी कोणाला तरी कोर्टात पाठवले आहे. त्यांना भीती वाटतेय की, या योजनेमुळे आता त्यांचे सरकार येणार नाही. ही योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्न करत आहेत.
ये तो सिर्फ झाकी है!
‘ये तो सिर्फ झाँकी है, अभी दो महिने बाकी है,’ असा सूचक इशारा देत शिंदे यांनी विरोधकांना डिवचले. बाजारात बर्नरचा मोठा तुटवडा आहे; त्यामुळे मोठी मागणी आहे; कारण विरोधकांना सध्या फार जळजळ होत असल्याची टीका त्यांनी केली. गर्दी पाहून शिंदे म्हणाले, अशा बहिणी मिळवायला नशीब लागते. आजपर्यंत मला एकच सख्खी बहीण आहे, असे मी मानत होतो; पण मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आले की, लाखो बहिणी आहेत!