३ आठवड्यांत १५ अतिगंभीर बालरुग्णांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:12+5:302021-05-23T04:04:12+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुले, नवजात शिशूंना कोरोनाची लागण आणि प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुले, नवजात शिशूंना कोरोनाची लागण आणि प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले. अशा परिस्थितीत गेल्या ३ आठवड्यांत तब्बल १५ अतिगंभीर बालरुग्णांनी कोरोनाला हरविले. एमजीएम रुग्णालयातील डाॅक्टरांनी या मुलांवर यशस्वी उपचार करीत त्यांना कोरोनातून बाहेर काढले.
एमजीएम रुग्णालयात शनिवारी पत्रकार परिषदेत या बालकांच्या उपचारासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र बाहेरा, उपअधिष्ठाता डाॅ. प्रवीण सूर्यवंशी, बालरुग्ण अतिदक्षता विभागाचे डाॅ. विनोद इंगळे यांनी संवाद साधला. या १५ मुलांपैकी एका बालरुग्णाचे वय केवळ १३ महिने होते. त्याचा एचआरसीटी स्कोअर १४ होता. याशिवाय एकाचा स्कोअर ८ आणि दुसऱ्याचा ४ होता. आयसीयूतून बरे होऊन तिघे घरी गेले.
दोन रुग्ण असे होते की, ज्यांचे वय २ व ३ वर्षे होते. कोरोनासह आलेला ताप मेंदूपर्यंत गेला होता. त्यातून मेंदूला सूज आली होती. एका बालरुग्णाच्या हृदयाभोवती, फुफ्फुसाभोवती पाणी जमा झाले होते. यांच्यासह किडनीचा आजार असलेल्या ८ वर्षांच्या मुलाने आणि रक्ताचा कर्करोग असलेल्या दोन मुलींनीही कोरोनावर मात केली. या सर्व मुलांच्या उपचारासाठी डाॅ. विनोद इंगळे, बालरोग विभागप्रमुख डाॅ. माधुरी एंगडे, बालरक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ डाॅ. तुषार इधाटे, नवजात शिशुतज्ज्ञ डाॅ. सुनील गव्हाणे, डाॅ. अंजली काळे, डाॅ. हासीब, डाॅ. सिद्दीकी आदींनी परिश्रम घेतले.