30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 01:20 PM2022-01-29T13:20:02+5:302022-01-29T13:20:45+5:30
डायऱ्यांमध्ये धक्कादायक माहिती, एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेत विद्यमान आमदार, जिल्हा परिषद सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोडच्या तीन डायरीत आढळल्या आहेत. डायरीत नोंद असलेल्या ३०० नावांच्या व्यक्तींचा हिशेब ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक जुळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिडकीन पोलीस ठाण्यात दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २१ जानेवारी रोजी दिली होती. त्या प्रकरणात ३०:३० योजना घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोड याच्यासह तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष राठोड यास ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने कोठडीत दिलेल्या माहितीनुसार नातेवाइकाकडे लपवलेल्या तीन डायऱ्या पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या डायऱ्यांमध्ये तब्बल ३०० गुंतवणूकदारांची नावे आहेत. त्या सर्व गुंतवणुकीचा हिशेब पोलिसांनी केला आहे. हा हिशेब तब्बल ३५० कोटीपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये औरंगाबाद शहरातील एक पेट्रोलपंप चालक, कंत्राटदाराने सुरुवातीला ६ कोटी, दुसऱ्या वेळी ७ कोटी रुपये योजनेत गुंतवले आहेत. त्या गुंतवणुकीचा परतावा तीन टप्प्यात मिळाला आहे. त्या परताव्याची नोंद ३० लाख, ७० लाख आणि १ कोटी रुपये असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय एका आमदाराने ७५ लाख रुपये गुंतवणूक केल्याची नोंद आहे. त्याशिवाय जि. प. सदस्याने शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून सव्वा तीन कोटी, एका नगरसेवकाने सव्वा दोन कोटी रुपये गुंतवले असल्याचेही डायऱ्यांमधील नोंदीत आढळले आहे.
परताव्यानंतर खोडल्या जात होत्या नोंदी
संतोष राठोड हा गुंतवणूकदारांच्या नोंदी पेन्शीलच्या साहाय्याने डायरीमध्ये करीत होता. संबंधितांना परतावा मिळाल्यानंतर त्या नोंदी खोडल्या जात असत. नव्याने गुंतवणूक झाल्यावर त्यात नोंद केली जात होती. ३० एप्रिल २०१३ रोजी योजना सुरू केली होती. तेव्हापासूनच्या नोंदी सापडल्यास हा घोटाळा हजार कोटींमध्ये जाण्याची शक्यताही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
३०:३० योजना घोटाळ्यातील गुंतवणुकीचा आकडा वाढला असल्यामुळे गुन्ह्याचा तपास बिडकीन पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस कोठडीत असलेला आरोपी संतोष राठोड याच्या डायऱ्यांमधील गुंतवणुकीच्या नोंदी ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातच गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
नातेवाइकांना प्लॉट देण्याचे आमिष
आरोपी संतोष राठोड याने गुंतवणूक केलेल्या जवळच्या नातेवाइकांनी स्वत:च्या नावावर असलेले प्लॉट कोठडीतून बाहेर आल्यानंतर नावावर करून देतो, असे आमिष दाखवले आहे. त्याशिवाय इतर गुंतवणूकदारांनाही कोलकाता, नाशिक येथे केलेल्या गुंतवणुकीची विक्री करून पैसे परत केले जातील, असे आश्वासन एजंटामार्फत दिले आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदार पैसे परत मिळण्याच्या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.