30-30 Scam: डायरीत आहेत कोट्यावधीच्या नोंदी; ३०० जणांनी केली १० लाख ते २.५० कोटींची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 01:50 PM2022-01-25T13:50:14+5:302022-01-25T13:50:42+5:30
कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असलेली डायरी पोलिसांच्या ताब्यात
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३० : ३० योजनेत २० लाख रुपये ते २ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या ३०० जणांच्या नावाची मुख्य आरोपी संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड याची डायरी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये १ लाख रुपयांना प्रतिमहिना ७ ते तब्बल ६० हजार रुपयांचा परतावा देण्यात येत असल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिडकीन पोलीस ठाण्यात ३०:३० योजनेत फसवणूक झालेल्या दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २१ जानेवारी रोजी केली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात पोलिसांनी घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यास सुरुवातीला ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदारे हाती लागले आहेत. आरोपी संतोषने नातेवाइकाकडे ठेवलेली एक डायरी पोलिसांना प्राप्त झाली. या डायरीत तब्बल ३०० पेक्षा अधिक जणांच्या नावाचा समावेश आहे. प्रत्येक जणांच्या नावापुढे गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यांना देण्यात येणाऱ्या परताव्याची नोंद करण्यात आली आहे. या नोंदीमध्ये सर्वात कमी रक्कम ही १० लाख रुपये असून, सर्वाधिक रक्कम ही २ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. या एका डायरीतील नोंदीचा व्यवहार हा काही कोटींमध्ये पोहोचला असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ज्योती ढोबळे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांना राठोडच्या बीड बायपास रोडवरील घरातून एक डायरी प्राप्त झाली होती. त्यामध्ये माजी मंत्री, आमदारांसह बड्या-बड्या राजकीय नेत्यांची नोंद होती. त्या डायरीविषयी बोलताना राठोड याने भावाच्या लग्नाला आमंत्रण देण्यासाठी त्या नाेंदी केल्याचे स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्यात तथ्य नसल्याचेही चौकशीत समोर आले.
नाशिक, कोलकाता येथे गुंतवणूक
आरोपी संतोष राठोड याने शेतकऱ्यांकडून उकळलेल्या कोट्यवधी रुपयांमधून कोलकाता, नाशिक येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. बिडकीन पोलिसांचे एक पथक नाशिकला त्याच्या मित्राला पकडण्यासाठी रविवारी गेले होते; मात्र राठोड यास अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर राठोडचा मित्र फरार झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय कोलकाता येथील काही बांधकाम व्यावसायिकांसोबतही गुंतवणूक केली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, औरंगाबादमध्येही त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजकीय नेत्यांनी गोळा केला पैसा
संतोष राठोड याच्या ३०:३० योजनेमध्ये औरंगाबाद शहरातील काही हॉटेल व्यावसायिक,नगरसेवक, आमदारांनी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील जि. प. सदस्य, आमदार, माजी आमदार, माजी मंत्र्यांसह विद्यमान मंत्र्यांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले. हा सर्व पैसे ब्लॅक असून, त्यांच्या कोठेही नोंदी नाहीत. तसेच हा व्यवहार आरटीजीएसद्वारे झालेला नसल्यामुळे संबंधितांना तक्रारही देता येत नाही अन् पैसेही वसूल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय काही गावनेत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे योजनेत गुंतवले आहेत.
३० आकड्यांचे आकर्षण
संतोष राठोड यास ३० आकड्यांचे प्रचंड आकर्षण आहे. त्याने या योजनेची सुरुवात ३० तारखेलाच केली होती. त्याशिवाय दुसरे लग्नही ३० तारखेलाच केले. अपत्यप्राप्तीही ३० तारखेलाच झालेली आहे. त्याशिवाय शेतकरी, राजकीय नेत्यांकडून गुंतवणुकीसाठी पैसे गोळा करण्यास ३० निष्ठावंतांची निवड केली होती. त्या सर्वांना मोबाइल नंबर, चारचाकी गाड्यांचे नंबरही त्याने ३० आकडा असणारेच दिल्याचे त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले.
समाजातील अधिकारी, उच्चभ्रूंवर नजर
राठोडने नेमलेले एजंट हे स्वत:च्या समाजातील अधिकारी, उच्चभ्रूंच्या घरी जाऊन योजनेत गुंतवणूक केल्याचे फायदे सांगत होते. पैसे गुंतविल्यास अधिक परतावा मिळेल, असेही आमिष दाखविण्यात येत होते, असे एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना सांगितले.