३०: ३० घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली; पाच जणांची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:34 IST2024-11-30T12:34:26+5:302024-11-30T12:34:33+5:30
गुन्हा दाखल होताच अनेकांची पोलिस आयुक्तालयात धाव

३०: ३० घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली; पाच जणांची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात गाजलेल्या ३०:३० घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली आहे. दोन जणांनी १ कोटी ९५ लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदविल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी पाच जणांनी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूक झाल्याचा जबाब नोंदवला. त्यात २ कोटी २८ लाख ३५ हजारांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अटक आरोपींच्या घराची झडती घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या रिटर्नचे आमिष दाखवून घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड याने अनेकांना कोट्यवधी रुपयांना फसवले. बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर संतोष वर्षभर कारागृहात होता. त्याने कारागृहातून सुटल्यानंतर अनेकांना पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बाहेर आल्यानंतर वर्ष होत आले तरी पैसे परत दिले नसल्यामुळे पुन्हा संतोषच्या विरोधात तक्रारीसाठी नागरिक पुढे येत आहेत. फिर्यादी प्रमोद राठोड यांच्यासह त्यांचे चुलतभाऊ राजेंद्र जाधव यांची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन एजंटांना अटक केली. मुख्य आरोपी फरार आहे. त्याचवेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी फसवणूक झालेल्यांना समोर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार कल्याण चव्हाण (रा. नाईकनगर, बीड बायपास) यांची ८६ लाख ८० हजार, राजू राठोड (रा.रेणुकानगर,) यांची ४० लाख ६५ हजार, शेषराव राठोड (रा. रेणुकानगर) यांची १० लाख, अविनाश राठाडे (रा. केकत पांगरी, ता. गेवराई) यांची ५४ लाख ९० हजार आणि जयसिंह आडे (रा. नाईकनगर, बीड बायपास) यांची ३६ लाख रुपये अशी एकूण पाच जणांनी २ कोटी २८ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा जबाब नोंदवला. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती ४ कोटी २३ लाख ३५ हजार रुपयांवर गेली आहे.
आरोपींची संपत्ती जप्त होणार
आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या संपत्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या आरोपींना एमपीआयडी कायदा लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून अटक आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. तसेच फरार आरोपींच्या संपत्तीचाही शोध सुरू केल्याचे निरीक्षक पवार म्हणाले.