औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे महिनाभरात ३० रुग्ण; साडेचार हजार ठिकाणी डासअळींची उत्पत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:37 PM2018-09-07T15:37:28+5:302018-09-07T15:39:47+5:30
महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली.
औरंगाबाद : पावसाच्या विश्रांतीबरोबर शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूने डोके वर काढले आहे. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. औरंगाबादेत १८ रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या महिनाभरात मोजके दिवस पाऊस पडला. त्यातून ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला आणि जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडला.
जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या गेल्या ७ महिन्यांत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळले होते. पावसामुळे रुग्णसंख्या महिनाभरात दुपटीने वाढली. गेल्या महिनाभरात ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. यामध्ये ग्रामीण भागांत १२, तर औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत १८ रुग्ण सापडले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता हा आकडा मोठा असल्याची शक्यता आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यावर आरोग्य विभागातर्फे भर दिला जातो; परंतु शहर आणि ग्रामीण भागामध्ये आढळून येणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाहता हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात महिनाभरात ४ हजार ४३१ ठिकाणी डासअळींची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. २६९ ठिकाणी अॅबेट टाकून डासांची अळी नष्ट करण्यात आली, तर ४ हजार १६२ ठिकाणचे पाणी रिकामे करून डासअळी नष्ट करण्यात आली. डास प्रतिबंधात्मक उपायाबरोबर आठवड्यातून किमान एक दिवस भांडी कोरडी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
पाऊस पडून गेल्यानंतर डास उत्पत्तीने डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. पैठण येथे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे; परंतु तो डेंग्यूचा रुग्ण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनीही पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.