कॅन्सर हॉस्पिटलसाठी ३० कोटींची यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:34 AM2017-11-12T00:34:05+5:302017-11-12T00:34:08+5:30
शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. या निधीतून २७ प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामग्रींची खरेदी होईल. यामुळे हे रुग्णालय आगामी काही महिन्यांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे. त्याचा राज्यभरातील गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.
कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने २०१६ मध्ये केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यादृष्टीने २९ जुलै २०१६ रोजी केंद्राच्या तीन सदस्यीय पथकाने रुग्णालयाची पाहणी केली होती. राज्य कर्करोग संस्थेसाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के निधी राहणार आहे, तर राज्य शासनाचा ४० टक्के आहे. याअंतर्गत केंद्र सरकारचा ४३ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला. रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रींचा प्रस्ताव देण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. आगामी काही महिन्यांत खरेदी प्रक्रिया होऊन ही यंत्रसामग्री रुग्णसेवेत दाखल होईल. या यंत्रसामग्रींमुळे रुग्णालय अधिक अद्ययावत होईल,असे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.