३० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:07 AM2017-07-30T01:07:55+5:302017-07-30T01:07:55+5:30
औरंगाबाद : हर्सूल गावाला उद्या रविवारपासून जायकवाडीचे पाणी देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हर्सूल गावाला उद्या रविवारपासून जायकवाडीचे पाणी देण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता नागरिकांना पाणी देण्यात येणार आहे. या भागात पाणीपुरवठ्याचे टप्पे करून दररोज पाच लाख लिटर पाणी देण्यात येईल.
हर्सूल गावाचा समावेश तीन दशकांपूर्वी मनपा हद्दीत झाला. गावातील नागरिकांना जायकवाडीच्या पाण्याची चवच माहीत नव्हती. वर्षानुवर्षे नागरिक हर्सूल-सावंगी येथील विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत होते. मागील दोन वर्षांपासून विहिरीतील पाणी कमी झाल्याने तब्बल ३० हजार नागरिकांची तहान कशी भागवावी असा प्रश्न भेडसावत होता. शहराप्रमाणे हर्सूल गावालाही जायकवाडीचे पाणी द्यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालून तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना हर्सूल कारागृहाजवळील पाण्याच्या टाकीतून पाणी द्यावे, अशी सूचना केली. हर्सूल कारागृहाजवळ मनपाने २० वर्षांपूर्वी मोठा जलकुंभ बांधला आहे. कारागृहापासून हर्सूल गावापर्यंत मोठी जलवाहिनी टाकण्यासाठी नगरसेवक पूनम बमणे यांनी पाठपुरावा केला. ६ लाख रुपये खर्च करून मनपाने स्वतंत्र जलवाहिनीही टाकली. मात्र, पाण्याची जोडणी करण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच मनपाने पाण्याची जोडणीही केली. हर्सूल गावात चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होतोय किंवा नाही, याची शहानिशा करण्यात आली. उद्या उद्घाटन करण्यात येणार असल्याचे नगरसेवक बमणे यांनी नमूद केले.