३० हजार शेतकरी पीकविम्यास अपात्र
By Admin | Published: March 5, 2017 12:30 AM2017-03-05T00:30:55+5:302017-03-05T00:31:54+5:30
लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़
लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्यासाठी जिल्ह्यातील ३० हजार ५६ शेतकरी अपात्र ठरले आहेत़ त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे़
सन २०१५-१६ च्या रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफुल, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग, भात अशा आठ पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात आली होती़ गत वर्षीच्या दुष्काळामुळे रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रबी हंगामही घेता आला नाही़ त्यातच ज्या शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला होता, त्या शेतकऱ्यांच्या पदरी पेरणीचा खर्चही पडला नाही़
दुष्काळामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६४५ शेतकऱ्यांनी रबी हंगामाच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता़ याअंतर्गत १ लाख ७९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा भरला होता़ या कृषी विम्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यापोटी जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्याचा २ लाख ६७ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित विमा कंपनीकडून लाभार्थ्यांच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या नाहीत़