जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित !

By Admin | Published: July 14, 2017 12:25 AM2017-07-14T00:25:46+5:302017-07-14T00:28:37+5:30

बीड : २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे

30 thousand students of the district deprived of scholarship! | जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित !

जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे. कोषागार कार्यालयाने समाजकल्याणच्या कामात नियमांच्या आडून ढवळाढवळ सुरू केली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे. समाजकल्याण विभाग याबाबत गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे.
भारत सरकारच्या वतीने मुलांना शिक्षणात आधार व्हावा व ती मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत, यासारखे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून त्यांचे अर्ज भरून घेतले जातात. अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती वाटप केली जाते. गतवर्षी जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप झाली आहे. उर्वरित विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील ४२१ महाविद्यालये शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. गत दोन वर्षांपासून आॅनलाईन कारभार झाल्यामुळेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले जातात. हे अर्ज महाविद्यालयाकडून सामाजिक न्याय विभागात पाठविले जातात. तेथे त्याची छाननी व पडताळणी होऊन बिलाच्या मंजुरीसाठी कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. परंतु नूतन कोषागार अधिकारी यांनी वेगवेगळ्या नियमांची अट घालून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली आहे. समाजकल्याणकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला असल्याचे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व त्रुटी काढण्याचे अधिकार हे समाजकल्याण विभागाला आहेत. परंतु कोषागार कार्यालयाने यामध्ये ढवळाढवळ सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 30 thousand students of the district deprived of scholarship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.