सिल्लोड एमआयडीसीसाठी पहिल्या टप्प्यात ३०० हेक्टर भूसंपादन
By बापू सोळुंके | Published: September 29, 2023 06:36 PM2023-09-29T18:36:01+5:302023-09-29T18:40:01+5:30
एमआयडीसी उभारणीसाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सिल्लोड न.प.ने त्यांच्या जलवाहिनीतून पाणी देण्याची तयारी दर्शविली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे ७०० हेक्टरवर औद्योगिक वसाहत उभारण्यास शासनाची जून महिन्यात मंजुरी मिळाली होती. आता या औद्योगिक वसाहतीसाठी पहिल्या टप्प्यात ३०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यास सुरुवात झाली असून यात सर्वाधिक शासकीय गायरान जमिनीचा समावेश आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आणि पैठण येथे औद्योगिक वसाहत चांगल्या प्रकारे विकसित झाली. वैजापूर येथेही सुमारे बाराशे एकरवर एमआयडीसी उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. मात्र, जमिनीच्या दरावरून शेतकरी आणि एमआयडीसी यांच्यात न्यायालयीन वाद उद्भवल्याने ही एमआयडीसी अद्याप अस्तित्वात येऊ शकली नाही. यादरम्यान गतवर्षीपासून सिल्लोड येथे औद्योगिक वसाहत व्हावी, यासाठी वक्फ आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्योग विभागाकडे पाठपुरावा केला होता. यानंतर एमआयडीसीने सिल्लोडजवळील रजाळवाडी, मोढा बुद्रूक, मंगळूर आणि डोंगरगाव या गावांलगत जमिनीचे सर्वेक्षण केले.
येथे एमआयडीसी उभारणीसाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सिल्लोड न.प.ने त्यांच्या जलवाहिनीतून पाणी देण्याची तयारी दर्शविली. यानंतर एमआयडीसीने तेथे ७०० हेक्टर जमिनीवर एमआयडीसी उभारण्यास मंजुरी दिली. दोन टप्प्यांत या जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यास सुरुवात झाल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली. ते म्हणाले की, सिल्लोड एमआयडीसीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर जमीन मालकांना मोबदला देणे आणि जमीन ताब्यात घेऊन विकसित करण्याचे काम हाती घेतले जाईल.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी
सिल्लोड, भोकरदन, कन्नड तालुक्यात मका, मिरची, अद्रक आणि कापसाचे भरघोस उत्पादन होत असते. कृषी माल आधारित मका प्रक्रिया उद्योग, मसाले उद्योग, टेक्स्टाइल मिल अशा उद्योगांना चांगली संधी आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.