श्रीकृष्णाची ३०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ मूर्ती चोरीला; आणखी एका पुरातन मूर्तीवर चोरट्यांची झडप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:46 PM2022-10-07T17:46:30+5:302022-10-07T17:46:44+5:30
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील घटना
सावखेडा (औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील मध्वनाथ महाराज समाधीसमोरील पुरातन दिव्य स्वरूप श्रीकृष्णाची पाषाणाची मूर्ती विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारी रात्री चोरीस गेल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथे ३०० वर्षांपूर्वीचा संत मध्वनाथ महाराज यांचा मठ आहे. या मठात संत मध्वनाथ महाराज यांनी राधा-कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. ३५ वर्षांपूर्वी येथील पाषाणाची राधेची मूर्ती चोरीस गेली. ती नंतर सापडली नाही. या पार्श्वभूमीवर येथील मठात भाविक दररोज श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेंदुरवादा येथील आनंदा निकम व इतर भाविक नित्याप्रमाणे दर्शनासाठी मठात आले असता त्यांना मठातील मध्वनाथ महाराज समाधी स्थळाजवळील श्रीकृष्णाची पुरातन पाषाणाची दोन फुटी उंचीची मूर्ती चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामस्थांना माहिती झाल्यानंतर खळबळ उडाली. याबाबतची माहिती वाळूज पोलिसांना देण्यात आली. वाळूजचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे व सहकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वान काही अंतरावर घुटमळले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
जांब येथील घटनेचा तपास लागेना
जालना जिल्ह्यातील जांब येथील मंदिरातील पंचधातूची श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची मूर्ती २२ ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. अशात श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथील पुरातन श्रीकृष्ण मूर्ती चोरीस गेल्याने पुरातन मूर्ती चोरणारी एखादी टोळी कार्यरत आहे की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.