१२ हजार सेवानिवृत्तांची ‘पेन्शन’ नसल्याने परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 01:55 PM2019-12-05T13:55:06+5:302019-12-05T13:56:34+5:30

उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे.

3,000 retirees with no pension | १२ हजार सेवानिवृत्तांची ‘पेन्शन’ नसल्याने परवड

१२ हजार सेवानिवृत्तांची ‘पेन्शन’ नसल्याने परवड

googlenewsNext
ठळक मुद्देसेवेनंतर हेलपाटे मारण्याची वेळ वेतन पडताळणीच्या संचिकांचा ढीग

- विकास राऊत 

औरंगाबाद : शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे. ३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे. वर्षापासून १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, आॅनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. या सगळ्या प्रकारात मराठवाड्यातून लांबवरून येणाऱ्या सेवानिवृत्तांचे जे हाल होत आहेत, ते शब्दांत व्यक्त होणे अवघड आहे. त्यातच काही सेवानिवृत्त अपंग आहेत. त्यांना तर कोषागार विभागातील कर्मचारी अतिशय हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. 

या सगळ्या चक्रव्यूहात सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणीच्या कामाला गती मिळण्याची आणि त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पाऊल उचलण्याची मागणी होत आहे. कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याची सेवापुस्तिका (वेतन पडताळणी) तो ज्या विभागातून निवृत्त झाला तेथून येते. तेथील आस्थापना लिपिकाने खोडसाळपणा करून पुस्तिका कोषागार विभागाला पाठविताना काही कागदपत्रे दिली नाहीत, तर पुस्तिका त्रुटींमुळे रखडते. कोषागार विभागातून सदरील पुस्तिका पुन्हा संबंधित विभागाला पाठविण्यात येते. हा सगळा प्रवास पाच ते सहा महिन्यांचा असतो. या काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला काहीही माहिती दिली जात नाही. मग काही दलाल मंडळी पुस्तिका मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गंडवितात. त्या दलालांची आणि संबंधित लिपिकांची मिलीभगत असते. संचिकेतील त्रुटी पूर्ण करून ती पुन्हा कोषागार विभागाकडे येते. सेवानिवृत्त पुन्हा कोषागार विभागाकडे विचारपूस करण्यासाठी येतात. तेथील अधिकारी, लिपिक सेवानिवृत्तांना अतिशय निम्नदर्जाची वागणूक देत असल्याचे चित्र कार्यालयात रोजचे झालेले आहे.

कोषागार अधिकाऱ्यांचे मत असे...
१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनपडताळणीचे काम सध्या सुरू आहे. लोकांना असे वाटते की, तातडीने मंजुरी मिळावी; परंतु कर्मचारी कमी आहेत. चार ते पाच कर्मचाऱ्यांवर पूर्ण काम करण्याची जबाबदारी आहे. सगळे काम आॅनलाईन चालते, १२ हजार सेवापुस्तिका सध्या आमच्याकडे आहेत. वेतन पडताळणी पुस्तिका पाहताना काही त्रुटी आढळल्या, तर लिपिक पातळीवरच सेवापुस्तिका संबंधित विभागाला पाठविण्यात येते. त्या विभागाकडून संचिका त्रुटी पूर्ण होऊन न आल्यास पुन्हा संचिका पाठविली जाते. १० पुस्तिकांपैकी ८ पुस्तिका नियमित असण्याचे प्रमाण आहे. सातव्या वेतन आयोगामुळे सेवानिवृत्तांच्या पुस्तिका एकदाच विभागाकडे आल्या. पूर्ण कामाचा ताण चार ते पाच कर्मचाऱ्यांवर आहे. विभागाच्या सर्व सेवापुस्तिका येथे येतात. कार्यालयाकडे रोज नागरिकांची गर्दी वाढते आहे; परंतु सगळे काही आॅनलाईन आहे. त्यामुळे काही करता येत नाही. असे प्रभारी सहसंचालक तथा कोषागार अधिकारी आर.व्ही. लिंगणवाड यांनी सांगितले.

Web Title: 3,000 retirees with no pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.