३०:३० घोटाळ्याची व्याप्ती वाढली; महिन्याला १५ टक्के रिटर्नचे आमिष दाखवून २ कोटींना फसवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:12 PM2024-11-29T14:12:29+5:302024-11-29T14:13:12+5:30
उस्मानपुरा पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजलेल्या ३०:३० घोटाळ्याचे लोण शहरातही पोहोचले आहे. मुख्य आरोपीसह चौघांनी शहरातील दोघांची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेने चार पैकी दोन आरोपींना अटकही केली आहे.
आरोपीमध्ये ३० : ३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (रा. पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास), एजंट राजेंद्र ऊर्फ पंकज प्रल्हाद जाधव (रा. लिंक रोड, गोलवाडी), सुहास पंडित चव्हाण (रा. बंजारा कॉलनी) आणि अमोल कृष्णा चव्हाण (रा. नाईकनगर, बीड बायपास) अशी आरोपींचे नावे आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात प्रमोद पंडित जाधव ( रा. बंजारा कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मामेसासरे असलेले एजंट राजेंद्र जाधव यांनी ३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोड यास फिर्यादीला भेटण्यास नोव्हेंबर २०२० मध्ये घेऊन आले. त्यांनी ३० : ३० योजनेविषयी माहिती दिली. त्यात केलेल्या गुंतवणुकीवर महिन्याला १५ टक्के रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. त्याविषयीची माहिती पुस्तिकाही दिली. त्याशिवाय या योजनेत गुंतवणूक केलेल्या अनेकांची नावेही सांगितली. त्यावर विश्वास बसल्यामुळे आरोपी संतोष राठोड व राजेंद्र जाधव यांच्या बँक खात्यात गुंतवणूक करण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे दिली. काही रकमेवर सुरुवातीला १५ टक्के परतावा देण्यात आला. मात्र, नंतर टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चारपैकी राजेंद्र व सुहास हे दोन आरोपी पकडले.
फिर्यादीच्या चुलत भावास १ कोटी ४५ लाखांना फसवले
फिर्यादी प्रमोद जाधव यांचे चुलत भाऊ राजेंद्र जाधव यांनाही संतोष व सुहास या दोघांनी ३०३:३० योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी गुंतवणूक करारनामा करून दिला. त्यामुळे राजेंद्र जाधव यांन आरोपी सुहास चव्हाणच्या बँक खात्यात ९५ लाख रुपये आणि संतोष राठोडच्या बँक खात्यात ५० लाख रुपये असे १ कोटी ४५ लाख रुपये पाठवले होते. या पैशाचा कोणताही परतावा गुंतवणूकदारास मिळाला नाही, उलट फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेची बनावट ऑर्डर दाखवली
फिर्यादीसह त्यांच्या चुलत भावाने गुंतवणूक केलेल्या पैशासह परताव्यासाठी आरोपींकडे तगादा लावला. तेव्हा आरोपीने रिझर्व्ह बँकेकडून ३०० ते ३५० कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगून, रिझर्व्ह बँकेची रिलिजिंग ऑर्डरची प्रत पाठवली. त्यात एकूण २८ लोकांची नावे आहेत. ऑर्डरची बनावट असल्याचे कळताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.
बिडकीन ठाण्यात दाखल होता गुन्हा
बिडकीन पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष राठोडसह इतरांच्या विरोधात ३०:३० घोटाळ्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. संतोष वर्षभर कारागृहात होता. मात्र, साक्षीदार उलटल्यामुळे त्यास जामीन मिळाला होता.
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले. राजेंद्र व सुहास या आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याचे पवार यांनी सांगितले.