३०५ कोटींचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:53 PM2017-09-23T23:53:50+5:302017-09-23T23:53:50+5:30
२७३ कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली असून, अमृत अभियानाअंतर्गत आगामी वर्षाच्या आराखड्यामध्ये २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : २७३ कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली असून, अमृत अभियानाअंतर्गत आगामी वर्षाच्या आराखड्यामध्ये २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या पाच आॅक्टोबरपर्यत याचा सर्व्हे करून तो सादर करण्यात येणार आहे. तसेच बीड शहरासाठी एकशे पाच कोटी रुपयांची अमृत योजना मंजूर झाली असून येत्या आठ दिवसात याचे कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या झालेल्या बैठकीत दोन्ही योजनांसाठी एकूण तीनशे पाच कोटी रुपये शहरासाठी मिळणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
गजानन सहकारी बॅक, आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, गजानन सह. सूतगिरणी, बीड ता.ख.वि.संघ या पाच संस्थाच्या कर्मचारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन स्व. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, देवीलाल चरखा, प्रा.जगदीश काळे, माधवराव मोराळे, दिनकर कदम, अरूण डाके, विलास बडगे आदी पदाधिकारी उपस्थित
होते.
‘चमकोगिरी म्हणजे विकास नव्हे’
विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असून केवळ फोटोसेशन करून आणि गाजावाजा करून विकास करण्याची काही जणांना अतिघाई असते. मात्र, मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करून त्या मिळविण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात. त्यावरच आम्ही भर देत असतो. शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सत्ता असो किंवा नसो आपण सातत्याने प्रयत्न करून विकासाची कामे करून घेत आहोत. शहरासाठी अनेक रस्त्याची कामे मंजूर झाली असून, त्या पैकी काही कामे आजही चालू आहेत. शहरातील महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून कायम स्वरूपाचे रस्ते आणि नाल्या ही कामे लवकरच पूर्ण होतील. शहरात अकरा ठिकाणी अमृत हरीत योजनेअंतर्गत गार्डनची योजना देखील साकारण्यात येणार आहे. शहरातील भुयारी गटार योजना आता मार्गी लागत असून दहा आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्याबरोबर या संदर्भात बैठक झाली. विविध विकास कामाच्या आढावा बैठकीत या योजनेसाठी मुख्यमंत्री महोदयांनी दोनशे कोटी रुपये तात्काळ मंजूर केले असून, अमृत पेयजल योजनेअंतर्गत भविष्यातील पन्नास वर्षाच्या लोकसंख्येचे नियोजन लक्षात घेऊन या योजनेचे काम होणार आहे. यासाठी एकशे पाच कोटी रुपये मंजूर झाले असून, येत्या आठ दिवसात याचे आदेश प्राप्त होणार आहेत. सर्व सामान्याचे हित जोपासावे यासाठीच या पाचही संस्थाचे कार्य पारदर्शकपणे चालू आहे.
या भागासाठी आणि शेतकºयांच्या हितासाठी अद्यावत अशा सूतगिरणीची उभारणी पूर्ण होत आहे. यासाठी कापसाला आता योग्य हमी भाव मिळायला हवा कर्जमाफी आवश्यक आहे. सातबारा कोरा झाला पाहिजे निसर्गाने साथ दिली आहे आता विजेची ही साथ मिळणे गरजेचे आहे. रब्बी हंगाम जवळ आला आहे हे लक्षात घेवून यासाठी प्रयत्नाची गरज आहे. गाजावाजा करणे, चमकोगिरी करून कामे होत नसतात मूलभूत विकास कामे करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे आजही विकासाची साथ देत आहेत वानगांव, वाढवणा आणि सांडरवण या तीनही ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. आपल्या संस्थेतून जवळपास अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, या संस्थेतील अनेक गुणवंत विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रात पोहोचले आहेत, असे आ.जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.