व्यापाऱ्यांना विवरणपत्रासाठी ३१ आॅगस्टची डेडलाईन
By Admin | Published: August 29, 2014 11:47 PM2014-08-29T23:47:09+5:302014-08-30T00:01:03+5:30
नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़
नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़ शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध असताना मनपाने दिलेल्या जाहीर सूचनेचे पालन किती व्यापारी करणार, याकडे लक्ष लागले आहे़
शहरात केवळ सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर एलबीटीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ नंतर तो कायमस्वरूपी केला़ राज्य शासनाने महापालिका हद्दीत लागू केलेली एलबीटी चार वर्षांपासून सुरू आहे़ अनेकदा किरकोळ बाबींवरून व्यापाऱ्यांवर धाड टाकून प्रतिष्ठान बंद केले जाते़ या धाडसत्राला कंटाळून व्यापाऱ्यांनीे वेळोवेळी आंदोलने केले़ दरम्यान, राज्य शासनाने एलबीटी किंंवा जकात हा निर्णय संबंधित महापालिकेवर सोपविला़ त्यानुसार नांदेड महापालिकेने हा निर्णय अद्याप जाहीर केला नाही़ एलबीटी किंवा जकात यासंदर्भात सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या सभेत कोणताच ठराव सादर करण्यात आला नाही़ परंतु एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे़ काही व्यापाऱ्यांनी नोटीस देवूनही आपले विवरणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ मुदतीनंतर जे व्यापारी विवरणपत्रे दाखल करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे़
मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या स्थानिक संस्था कराने यंदाही ४५ कोटींची वसुली केली आहे़ एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात रणशिंग फुंकले असतानाच महापालिकेने सर्वाधिक वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे़
मनपाच्या उत्पन्न वाढीचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराची वसुली मोहीम यावर्षी अडथळ्यांच्या शर्यतीत पार पडली़ ऐन मार्च तोंडावर असताना फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन करून एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला होता़
त्यामुळे वसुलीचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर होते़ व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे एलबीटी वसुलीवर मोठा परिणाम झाला़ व्यापाऱ्यांनी एलबीटीचे नाममात्र मासिक चालान भरण्याचे ठरविल्याने मार्च महिन्यात विशेष वसुली होवू शकली नाही़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वसुलीला पुन्हा खीळ बसली़ अखेर ४५ कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले़ सन २०१३- १४ या आर्थिक वर्षात एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत ३७ कोटी १६ लाख रूपयांची वसुली करण्यात आली़ सन २०११- १२ या वर्षात मनपाने ४३ कोटी १८ लाख एवढा महसूल प्राप्त केला होता़ मनपासमोर सन २०१४- १५ या वर्षात ७० कोटींचे उद्दिष्ट समोर आहे़ (प्रतिनिधी)