औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी ३१ जानेवारीची डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:05 PM2022-12-30T18:05:11+5:302022-12-30T18:05:26+5:30
कामचुकारपणा केला तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
औरंगाबाद : जळगाव टी पॉइंट ते अजिंठा लेणी रस्त्याचे अपूर्ण काम जानेवारी २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, अभियंत्यांना गुरुवारी पाहणीनंतर दिले. काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सोडवाव्यात, कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी ठप्प पडलेल्या रस्ते कामाची पाहणी केली. शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या अनुषंगाने औरंगाबाद जळगाव टी पॉइंट ते अजिंठा रस्त्यावरील सर्व काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी संयुक्त पाहणी केली. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्रीच्या तहसीलदार शीतल राजपूत, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगावचे तहसीलदार जसवंत, कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे, विकास महाले, शाखा अभियंता सागर कळंब, गजानन कामेकर, आदींची यावेळी उपस्थिती होती.
लेणी परिसरात सुविधा पुरवा
अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका, डॉक्टर, एक खिडकी तिकिटाची सोय, वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अजिंठा लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध असाव्यात; तसेच रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.