औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी

By विजय सरवदे | Published: September 13, 2022 02:51 PM2022-09-13T14:51:13+5:302022-09-13T14:51:37+5:30

जिल्ह्यातील औरंगाबादसह सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांतील ८ गावांमध्ये ३२ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे.

32 animals infected with 'lumpi' in Aurangabad district; Animal markets, exhibitions, races are banned | औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी

औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील ३२ पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली असून, हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यातील औरंगाबादसह सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांतील ८ गावांमध्ये ३२ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. यात औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव, सिल्लोड तालुक्यातील बाळापूर, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, पैठण तालुक्यातील शेकटा, ढाकेफळ, कौडगाव, तर गंगापूर तालुक्यातील गंगापूर या गावांचा समावेश आहे. असे असले तरी यापैकी २९ जनावरे औषधोपचारानंतर बरे झाली आहेत. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे लसीकरण व उपचाराचे सेवा शुल्क न आकारण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. इतर प्राण्यांमध्ये संसर्ग पसरू नये यासाठी पशू मालकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संसर्ग कळवा, अन्यथा कारवाई
या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित
दरम्यान, लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र घोषित केले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, जत्रा, प्रदर्शन, जनावरांची ने-आण, शर्यतीवर बंदी घातली आहे.

जिल्ह्यातील पशुधनाची स्थिती
एकूण पशुधन- ६, २६, ८८८
गायवर्गीय- ५, ३४, ३९४
म्हैसवर्गीय- ९२, ४९४
एकूण बाधित तालुके- ५
एकूण बाधीत गावांची संख्या- ८
५ किमी परिघातील गावांची संख्या- २९
बाधीत पशुधन- ३२
बरे झालेले पशुधन- २९
लसीकरण केलेले पशुधन- ५५२५
मृत जनावरे- ००

Web Title: 32 animals infected with 'lumpi' in Aurangabad district; Animal markets, exhibitions, races are banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.