जिल्ह्यात ३२२ गावे स्मशानभूमीविना!
By Admin | Published: May 14, 2014 12:26 AM2014-05-14T00:26:15+5:302014-05-14T00:28:43+5:30
सुनील कच्छवे , औ औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सुनील कच्छवे , औरंगाबाद स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही पुरोगामी विचारांनी ‘पुढार’लेल्या महाराष्टÑातील औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १,३९२ पैकी तब्बल सव्वातीनशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. या गावांना नागरिकांना ‘अंतिम’ संस्कारासाठी हक्काची दोन गज जागा देण्याचे औदार्य सत्ताधारी किंवा प्रशासनाने दाखविले नाही. मागील अनेक वर्षांपासून या गावांमधील नागरिक शेजारच्या गावांतील स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. विशेषत: पावसाळ्यात अंतिम संस्कार करताना नातेवाईकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणारच. त्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्काराचा विधी तरी चांगल्या वातावरणात पार पडावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच उपलब्ध नाही. आजवरच्या इतिहासात ग्रामपंचायतींना हा प्रश्न सोडविणे शक्य झालेले नाही. काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी जागा असली तरी त्यावर शेड नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर कुण्याच्या तरी खाजगी जागेत किंवा नदी, नाल्याकाठी अंत्यसंस्कार उरकावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावांचा ‘कारभार’ पाहणार्या ग्रामपंचायतींनी किंवा जिल्हा परिषद प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहिले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १,३९२ महसुली खेडी आहेत. त्यापैकी आजघडीला ३२२ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाही. स्मशानभूमीसाठी जेमतेम २० गुंठे जागा पुरेशी आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना अनेक अडचणी येतात. भर पावसाळ्यात एखाद्या नागरिकावर अंत्यसंस्कार करायची वेळ आल्यास नातेवकार्इंना खूप त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्तेही नाहीत. त्यामुळे जास्त चिखल झाल्यास अंत्यसंस्कारासाठी काही काळ पाहण्याची वेळ येते. २० गावांमधील स्मशानभूमींवर अतिक्रमण जिल्ह्यातील काही गावांमध्ये सात बाराच्या उतार्यावर स्मशानभूमीची नोंद आहे; पण ती विशिष्ट लोकांनी बळकावली आहे. काही ठिकाणी एखाद्या शेतमालकाने फार पूर्वी स्मशानभूमीसाठी जागेचा तुकडा दिला होता; पण आता जागेचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याने ती जागा ताब्यात घेतली आहे. जिल्ह्यात २० गावांमधील स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याची जिल्हा परिषदेकडे नोंद आहे.