३३ स्वस्त धान्य दुकानांवर होणार निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:07 AM2017-09-05T01:07:46+5:302017-09-05T01:07:46+5:30
३३ दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करताना मागील तीन महिन्यांत ज्या स्वत धान्य दुकानदारांची आधार कार्ड पडताळणी दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ३३ दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या असून २५ टक्क्यांपेक्षा कमी आधार पडताळणी असणाºया ५२ दुकानांचा धान्य कोटा कमी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात १२८० स्वस्तधान्य दुकाने असून, लाभार्थ्यांची संख्या दोन लाख ८८ हजार ३५२ एवढी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक स्वस्तधान दुकानदारास ई-पॉस मशीनचे वाटप केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ई-पॉसद्वारेच धान्य वाटप करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. स्वस्तधान्य दुकानदारांकडून याची अंमलबजावणी सुरू असली तरी काही तालुक्यांमध्ये ईपॉसद्वारे धान्य वाटपानंतर आधार पडताळणीचे प्रमाण कमी आहे. बदनापूर व भोकरदन तालुक्यातील आधार पडताळणीचे प्रमाण सर्वात कमी आहे. याबाबत सूचना देण्यासाठी सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांची बैठक घेतली. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याअखेर ई-पॉसद्वारे दोन लाख ४२ हजार ९३८ लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले असून, आधार पडताळणीचे प्रमाण ५८.१० टक्के आहे. आधार पडताळणीचे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी सर्व स्वस्तधान्य दुकानदारांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना नंदकर यांनी दिल्या. मागील तीन महिन्यांत आधार पडताळणीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असणाºया स्वस्तधान्य दुकानांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या. आधार पडताळणीचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत असणाºया सुभाष गाडगे, राजू लहाने, रंगनाथ नागरे या स्वस्तधान्य दुकानदारांचा पुरवठा अधिकारी नंदकर यांनी सत्कार केला.