जिल्ह्यामध्ये नोंदणी ३३ हजार आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:12+5:302021-01-15T04:05:12+5:30
कर्मचार्यांची, डोस ४६ टक्के लोकांना दोन डोसनुसार नियोजन : मनपाअंतर्गंत नऊ हजार, ग्रामीणमधील सहा हजार ५०० कर्मचाऱ्यांना लस औरंगाबाद ...
कर्मचार्यांची, डोस ४६ टक्के लोकांना
दोन डोसनुसार नियोजन : मनपाअंतर्गंत नऊ हजार, ग्रामीणमधील सहा हजार ५०० कर्मचाऱ्यांना लस
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. औरंगाबादला बुधवारी ३४ हजार डोस मिळाले आहेत, पण दोन डोसनुसार केवळ १५ हजार ५०० म्हणजे ४६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन सध्या करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. आजवरची ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून लसींचे वितरण करण्यात आले. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक विभागास ६४ हजार ५०० डोस प्राप्त झाले. यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३४ हजार डोस मिळाले आहेत. एक डोस घेतल्यानंतर महिनाभराने दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नोंदणीच्या तुलनेत कमी डोस मिळाले आहेत. शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेला २० हजार डोसचे वितरण करण्यात आले, तर जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गंत ग्रामीण भागांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १४ हजार डोस मिळाले.
१० टक्के वेस्टेज
मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, प्रत्येकी दोन डोस दिले जाणार आहेत. मनपाला २० हजार डोस मिळाले आहेत. त्यात १० टक्के वेस्टेज डोस पकडण्यात येणार आहे. मनपाअंतर्गत नाेंदणी झालेल्या २४ हजार कर्मचाऱ्यांपैकी नऊ हजार कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे. त्यानुसार १८ हजार डोस वापरले जातील.
टप्प्याटप्प्याने लस होतील उपलब्ध
ग्रामीण भागांसाठी मिळालेल्या १४ हजार डोसनुसार ६ हजार ५०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन डोस दिले जातील. एक डोस दिल्यानंतर साधारण महिनाभराने दुसरा डोस दिला जाईल. टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध होतील. त्यानुसार कर्मचाऱ्यांना डोस दिले जातील. डोस काढताना गळती होते. त्यामुळे १० टक्के वेस्ट पकडण्यात आले आहे.
- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
---
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला उपलब्ध झालेले डोस - ३४,०००
नोंदणी केलेले आरोग्य सेवक-३३,०००
किती लोकांना मिळणार लस-१५,५००
एकूण बुथ-१०