औरंगाबाद जिल्ह्यातील ३३१ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:25 AM2018-06-24T00:25:30+5:302018-06-24T00:26:48+5:30
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३३१ वर्गखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३३१ वर्गखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केला. तेव्हा वैजापूर तालुक्यात धोकादायक वर्गखोल्यांचा अहवाल सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शिक्षण सभापती मीना शेळके यांनी सर्वच तालुक्यांतील धोकादायक वर्गखोल्यांचा अचूक अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना दिले.
शुक्रवारी शिक्षण सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक झाली. सध्या पावसाचे दिवस असून, अनेक शाळांचे छत, पत्रे खराब झाले आहेत. पावसात शाळा गळते. काही शाळांमध्ये तर वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, त्या कधीही पडू शकतात, असे गटशिक्षणाधिकाºयांनी सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकाºयांनी धोकादायक वर्गखोल्यांची आकडेवारी सादर केली. तेव्हा वैजापूर तालुक्यात अवघ्या तीनच वर्गखोल्या धोकादायक असल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी सांगितले. तेव्हा पुन्हा एकदा मुख्याध्यापकांकडून अचूक माहिती प्राप्त करा आणि खरी आकडेवारी सादर करा, असे सभापती शेळके यांनी सांगितले.
या बैठकीत विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये ४०० रुपयांऐवजी ६०० रुपये जमा करण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार प्राप्त रकमा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंबंधी चर्चा झाली. यावेळी पैठण येथे गुरुकुल इंग्रजी शाळा ही ‘आरटीई’ कायद्याच्या निकषानुसार भरत नसल्याची चर्चा झाली. ही शाळा भरते त्याशेजारी ‘बीअर बार’ आहे. त्यामुळे ती शाळा तात्काळ मूळ मान्यता असलेल्या जागेवर स्थलांतरित करावी, अन्यथा ती तात्काळ बंद करण्यात यावी, असे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात
आले.
जिल्ह्यांमध्ये शिक्षण विस्तार अधिकाºयांचा समतोल राखला जावा, या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. काही तालुक्यांमध्ये एकही शिक्षण विस्तार अधिकारी नाही, तर जि. प. शिक्षण विभागात चार आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ४ शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. तालुकानिहाय किमान दोन विस्तार अधिकारी असावेत. सध्या बदलीचा कालावधी नसला, तरी कामाची निकड लक्षात घेऊन विस्तार अधिकाºयांना पदस्थापना देण्यात याव्यात, असा निर्णय सभापती शेळके यांनी घेतला.
धोकादायक वर्गखोल्या अशा
तालुका धोकादायक वर्गखोल्या
औरंगाबाद ७०
फुलंब्री १३
सिल्लोड ३९
सोयगाव २३
कन्नड १७
खुलताबाद ३०
गंगापूर ५८
वैजापूर ०३
पैठण ७८