Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट, २५ व्हीव्हीपॅट पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:38 PM2019-04-24T14:38:56+5:302019-04-24T14:41:02+5:30
ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता.
औरंगाबाद : मतदान प्रक्रिया सुरू करताना आणि सुरू झाल्यानंतर सुमारे ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट आणि २५ व्हीव्हीपॅट बंद पडले. यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब झाला. ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले की, मॉकपोलदरम्यान सकाळी २४ बॅलेट युनिट बंद पडले. १७ कंट्रोल युनिट आणि १८ व्हीव्हीपॅट सुरूच झाले नाहीत. १० बॅलेट युनिट आणि ५ कंट्रोल युनिट आणि ७ व्हीव्हीपॅट मतदान सुरू असताना बंद पडले. ०.७५ टक्के यंत्र मॉकपोलदरम्यान बंद पडले, तर ०.३० टक्के ईव्हीएम मतदान सुरू असताना बंद पडले. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट हळू सुरू होत असल्याच्या तक्रारीही आल्या. १५ सेकंद व्हीव्हीपॅटसाठी गेले. १ हजार मतांसाठी १५ हजार सेकंदांचा वेळ जाणार असल्याचे गृहीत धरून आयोगाने १ तास मतदानाची वेळ वाढविली. शहरात जवळपास ९० बुथवर अतिरिक्त मनुष्यबळदेखील वाढवून देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गंगापूर तालुक्यातील एका गावाचा बहिष्कार कायम
गंगापूर तालुक्यातील शहीदपूरवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार कायम आहे. सदरील गाव वैजापूर मतदारसंघात आहे. रस्त्याचे काम मागील पाच वर्षांत रखडल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी, नायब तहसीलदारांनी ग्रामस्थांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही.
शारदा मंदिरमध्ये ‘ईव्हीएम’ यंत्र पडले बंद
औरंगपुरा येथील शारदा मंदिर क न्या प्रशालेत सकाळी ‘ईव्हीएम’ यंत्र बंद पडल्यामुळे तासभर मतदान प्रक्रिया खोळंबली. मतदान केंद्रावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधून दुसऱ्या ‘ईव्हीएम’ यंत्रावर मतदान प्रक्रिया सुरू केली. या मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही. सकाळी थोडी रांग दिसून आली; पण दुपारी १२ वाजेनंतर मात्र हे मतदान केंद्र ओस पडलेले होते. २६४ क्रमांकाच्या या केंद्रावर ६७७ मतदारांची मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
कडा कार्यालयात मतदानाला उशीर
कडा कार्यालयातील मतदान केंद्र २१९ आणि २२२ वर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान सुरु होऊ शकले नाही. केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. एका तासानंतर या दोन्ही केंद्रावरील यंत्रांतील बिघाड दुरुस्त झाला.