१६ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात, एकजण बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:07 AM2021-01-13T04:07:12+5:302021-01-13T04:07:12+5:30
दत्ता जोशी घाटनांद्रा : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून, घाटनांद्रा ग्रामपंचायतीचे वातावरण तापले आहे. १७ जागांपैकी शिवसेनेकडून शिवशाही ...
दत्ता जोशी
घाटनांद्रा : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून, घाटनांद्रा ग्रामपंचायतीचे वातावरण तापले आहे. १७ जागांपैकी शिवसेनेकडून शिवशाही विकास पॅनलचे सुनील निकम हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर १६ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. दोन अपक्ष उमेदवारदेखील नशीब अजमावित आहेत.
या निवडणुकीत भाजप व शिवसेना पॅनलचे उमेदवार आमने-सामने रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने वॉर्ड क्रमांक चार आणि पाचमध्ये बंडखोरी झाली आहे, तर याच वॉर्डात भाजपच्या पॅनलला उमेदवार न मिळाल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना पक्षातील कार्यकर्त्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागत आहे. विद्यमान सरपंच लताबाई चंदनशिवे या वॉर्ड क्रमांक सहामधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, तर भाजपच्या सबका साथ सबका विकास या पॅनलमध्ये सासु-सुना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सासू देवकाबाई विजय जैस्वाल या क्रमांक एकमधून तर सून रेखा सचिन जैस्वाल या वॉर्ड क्रमांक सहामधून निवडणूक लढवित आहेत.
वॉर्ड क्रमांक पाचमधून एकदाही पराभूत न झालेले मोसिनखाॅ पठाण हे पाचव्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ते ही या निडणुकीत आपले नशीब आजमावित आहेत. तर विद्यमान उपसरपंच पुंडलीकराव मोरे हे अलिप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नवीन तरुण वर्ग पहिल्यांदाच निवडणुकीत उतरला आहे. १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमधील अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर शिवसेना पॅनलचे सुनील निकम हे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
घाटनांद्रा
एकूण मतदार संख्या : ६,८०९
पुरुष मतदार संख्या : ३७०६
महिला मतदार संख्या : ३१०३
------
घाटनांद्रा येथील ग्रामपंचायत कार्यालयाची भव्य इमारत. ( छायाचित्र दत्ता जोशी)