अर्ज रिजेक्ट झाल्याचे सांगून ग्राहकांच्या नावे परस्पर ३४ लाखांचे कर्ज; महिला अधिकाऱ्याचा प्रताप
By राम शिनगारे | Published: April 8, 2024 11:18 AM2024-04-08T11:18:22+5:302024-04-08T11:20:09+5:30
बँकेतीलच महिला अधिकाऱ्याने स्मॉल फायनान्स बँकेला ३४ लाखांना गंडवले
छत्रपती संभाजीनगर : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत नोकरीला असलेल्या ग्राहक जनसंपर्क अधिकाऱ्याने ७२ ग्राहकांची फसवणूक करीत ३४ लाख, ६० हजार ३४४ रुपयांना बँकेलाच गंडविले. याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्यासह चौघींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
आरोपींमध्ये ग्राहक जनसंपर्क अधिकारी (सीआरओ) स्वप्नरेखा भानुदास चौधरी- आघाव (रा. एन-२, रामनगर), बचत गटाच्या स्वयंघोषित अध्यक्षा सुरेखा ढोरे, कविता राठोड आणि पुष्पा साळवे यांचा समावेश आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक राजेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बँकेच्या गारखेडा परिसरातील शाखेला भेट देत दोन ग्राहकांनी आम्ही कर्ज घेतले नसताना आमच्या सिबील अहवालामध्ये ४५ हजार रुपयांचे कर्ज दिसत असल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीची चौकशी केली असता, दोन्ही ग्राहकांनी २०२३ मध्ये कर्जासाठी संपर्क साधला होता. कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणि केवायसी सादर केली. त्यानंतर सीआरओ स्वप्नरेखा चौधरी-आघाव हिने कर्ज नाकारल्याचे सांगितले. मात्र, संबंधितांचे कर्ज मंजूर झालेले होते. याविषयी सीआरओ चौधरी-आघावकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिने पैशाची अफरातफर केल्याचे कबूल केले. त्यानंतर बँकेने अधिक चौकशी केल्यानंतर ७२ खात्यावरून ग्राहकांना चौधरी-आघाव हिने फसवल्याचे आणि गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. ७२ पैकी ३५ ग्राहकांनी चौधरी-आघावच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. चौघींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अधिक तपास सहायक निरीक्षक दिलीप चंदन करीत आहेत.
अशी करायच्या फसवणूक
स्वप्नरेखा चौधरी-आघाव ही ग्राहकांशी कर्जाच्या गरजेबाबत संपर्क साधून इच्छुक ग्राहकांची कर्ज प्रक्रिया सुरू करणे, कर्ज-फॉर्म आणि केवायसी घेऊन ग्राहकांची दिशाभूल करीत होती. त्यानंतर मूळ ग्राहक समाेर उभे न करताच बचत गटाच्या स्वयंघोषित अध्यक्षा सुरेखा ढोरे, कविता राठोड आणि पुष्पा साळवे यांना ग्राहक भासवत होती. मूळ ग्राहकांच्या नावावर कर्ज घेऊन त्या निधीचा स्वत:साठी उपयोग करीत असल्याचे चौकशीत उघडकीस आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.