३४ जागी बोगस मतदान
By Admin | Published: October 21, 2014 12:55 AM2014-10-21T00:55:27+5:302014-10-21T01:14:36+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत.
सुनील कच्छवे , औरंगाबाद
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांत खऱ्या मतदारांना नंतर कागदी (प्रदत्त) मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत बोगस प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदारांना सोबत ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले होते; पण तरीही काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुपारनंतर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना कुणी तरी आधीच त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदारांकडे त्यांचे ओळखीचे पुरावे तपासून खातरजमा केली. तेव्हा खरोखरच दुसरेच कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील कागदी मतपत्रिका देऊन त्यावर संबंधित मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही १३ ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेचा वापर करावा लागला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र असा एकही प्रकार उघडकीस आला नाही. सिल्लोड २, फुलंब्री ३ आणि गंगापूर मतदारसंघात २ ठिकाणी असे प्रकार समोर आले. 1
मतदान केंद्रांवर गेल्यावर एखाद्या मतदाराला त्याचे मतदान आधीच नोंदविले गेल्याचे आढळते. ते मतदान त्याच्याऐवजी कुणीतरी दुसऱ्यानेच केलेले असते. अशा प्रकरणात आधी खातरजमा केली जाते. खरोखरच तसे घडले असेल तर मग खऱ्या मतदाराला मतदान करू दिले जाते. 2
मात्र, हे मतदान ईव्हीएमवर करणे शक्य नसते. त्यामुळे त्यासाठी आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राध्यक्षांकडे काही कागदी मतपत्रिका दिलेल्या असतात. त्याला प्रदत्त मतपत्रिका म्हणतात. त्यावर मतदान करून घेतले जाते.
3मात्र, हे मतदान मोजणीच्या वेळी विचारात घेतले जात नाही, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.