१८ राज्यांतील ३४१ भाविकांनी उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:59 AM2024-05-11T07:59:57+5:302024-05-11T08:00:17+5:30

आचार्य महाश्रमणजींच्या साक्षीने अक्षय्य तृतीया महोत्सव ठरला ऐतिहासिक

341 devotees from 18 states broke the year-long fast by consuming sugarcane juice | १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

१८ राज्यांतील ३४१ भाविकांनी उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : काहींनी वर्षभर तर काहींनी ३ वर्ष, ४ वर्ष उपवास केले. अशा १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी  शुक्रवारी (दि. १०) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे आचार्यश्री महाश्रमणजींच्या साक्षीने एकाचवेळी उसाचा रस ग्रहण करत उपवास सोडला. यावेळी उपस्थित हजारो समाजबांधवांनी ‘उपवास करनेवालो को अनुमोदना’ असे म्हणत उपवासधारकांचा सन्मान केला.

आचार्यश्री महाश्रमणजींच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक सोहळा अनुभवल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ‘एक दिवस उपवास, एक दिवस जेवण’ असे करत वर्षभर उपवास करणाऱ्या उपवासधारकांना आचार्यश्रींचे दर्शन घडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा निघून गेला होता. नवचैतन्य निर्माण झाले होते. हा क्षण पाहून अनेकांच्या मनात उपवास करण्याची भावना निर्माण झाली आणि त्याचवेळी शेकडो भाविकांनी पुढील वर्षभर उपवास करण्याचा संकल्प केला. जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११ वे आचार्यश्री महाश्रमणजींच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ‘अक्षय्य तृतीया वर्षतप पारणा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील प्रेसिडेंट लॉन्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला होता.  

धर्मपीठावरून उपवासधारकांचे नाव घेतले जात होते व उपवासधारक छोट्या वाटीत उसाचा रस घेऊन रांगेत उभे होते. नंबर आल्यावर आचार्यश्रींचे आशीर्वाद घेत व समोर ठेवलेल्या भांड्यात थोडा थोडा उसाचा रस टाकत होते. 
त्यानंतर सर्व उपवासधारकांनी उसाचा रस पिऊन उपवास सोडला. या सोहळ्याला सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आचार्यश्री महाश्रमण अक्षय्य तृतीया प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार, डॉ. अनिल नहार, सुनील राका, राजेंद्र डोसी, संजय सेठिया, महेंद्र सुराणा, कौशिक सुराणा, अंकुर लुणिया, राजकुमार बांठिया, तेरापंथ युवक परिषदेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

२५ उपवासधारकांचा समावेश 
वर्षभर उपवास करणाऱ्या ३४१ भाविकांमध्ये २५ जण छत्रपती संभाजीनगरातील आहेत. त्यात तेरापंथी समाजातील १४ व सकल जैन समाजातील ११ भाविकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १२९ भाविकांनी वर्षतप पारणा केला. 

४२ वर्षांपासून उपवास करणारी महिला 
छत्रपती संभाजीनगरची 
    मागील वर्षभर उपवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ४२ वर्षांपासून उपवास करणाऱ्या  शांताबाई कोठारी (सिडको, छत्रपती संभाजीनगर),  केसरबाई जैन (पिंपळनेर) यांनी ४० वा वर्षतप पारणा तर कमलादेवी कोचर  (बिकानेर) यांनी ३३ वर्षतप केले. 
    २१ वर्षांची विकलांग मुलगी लक्षिता लोढा हिने वर्षभर उपवास केला. 
    साधू-साध्वीजींनीही वर्षतप पारणा केला. यात मुनी लक्ष्यकुमारजी, मुनी राजकुमारजी, मुनी अजितकुमारजी, मुनी चिन्मयकुमारजी व अन्य तीन साध्वीजींनी वर्षतप पारणा केला.
 

Web Title: 341 devotees from 18 states broke the year-long fast by consuming sugarcane juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.