मराठवाड्यात रविवारी कोरोनाच्या ३४९ नव्या रुग्णांची वाढ; १० मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 02:18 PM2020-11-30T14:18:56+5:302020-11-30T14:23:39+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ११६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३४९ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सहा जिल्ह्यांमध्ये दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ३५ नवे रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत २० हजार ३६० बाधित रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ५४९ जणांचा बळी गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शिवाय दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५ हजार ७२७ वर पोहचली. यातील ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचे १८ रुग्ण नोंद झाले आहेत. दिवसभरात २३४ तपासण्यांमध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आता ७ हजार ९५ एकूण रुग्ण झाले असून, त्यातील ६ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १३० रुग्ण उपचार घेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे सहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३५९ वर पोहोचली. आतापर्यंत ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाने आणखी तीन बळी घेतले. ४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६४ जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १५ हजार ५७९ इतका झाला आहे, तर १४ हजार ५८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४९४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जालना जिल्ह्यात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १२ हजार २८३ वर गेली असून त्यातील ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचे ६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ११६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३, ३०० झाली आहे. यातील ४१, १७६ रूग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. तर एकूण १, १४५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.