३५ वर्षांनंतर ‘बबऱ्या’ जाळ््यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 12:49 AM2017-01-16T00:49:20+5:302017-01-16T00:51:55+5:30
लातूर : तब्बल ३५ वर्षापूर्वी आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यात आपल्याला अटक होईल, हे ध्यानीमनी नसलेल्या बबऱ्या भोसलेच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री आवळल्या
लातूर : तब्बल ३५ वर्षापूर्वी आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यात आपल्याला अटक होईल, हे ध्यानीमनी नसलेल्या बबऱ्या भोसलेच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री आवळल्यानंतर गुन्ह्यांच्या घटनांचा पटच डोळ््यासमोर उभा राहिला. पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला तब्बल ३५ वर्षानंतरही पोलीस जेरबंद करते, हेच यातून पुढे आले आहे. एका गुन्हेगार सहकाऱ्याने दिलेल्या माहितीने बबऱ्याला पोलिसांच्या जाळ््यात अलगद ओढले आणि बबऱ्याच्या गुन्हेगारी विश्वाचा उलगडा झाला.
चाकूर तालुक्यातील कारेवाडी येथील मुळचा असलेला बबऱ्या शितोळ््या भोसले हा १९८१ साली रेणापूर येथील झोपडपट्टीतील घराला आग लावल्याप्रकरणी रेणापूर पोलिसांना हवा होता. मात्र, गेल्या ३५ वर्षापसून तो पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून फरार होता. आता बबऱ्याचे सध्याचे वय हे ५८ आहे. तारुण्यात केलेल्या गुन्ह्यात आयुष्याच्या सांयकाळी पोलीस अटक करतील यावर बबऱ्याचाही विश्वास बसत नव्हता. मात्र, एका गुन्हेगाराच्या माहितीवरुन बबऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे पुढे आले आणि पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर बबऱ्याचा ठावठिकाणा लागला...वेताळ झोपडपट्टी घाटशिळ, तुळजापूर असा त्याचा पत्ता पोलिसांच्या हाती आला. एकंदरित त्याची पूर्ण माहिती मिळविल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या अटकेची तयारी केली. वार गुरुवार, रात्रीची २.३० वाजताची वेळ...लातूरहून पोलिसांचे वाहन तुळजापूरच्या दिशेने सुसाट निघाले. दरम्यान, काही दिवसापूर्वी बबऱ्या ज्या झोपडपट्टीत राहत होता त्या परिसराची पाहणीही पोलिसांनी केली होती. मध्यरात्री अचानक घाटशिळच्या वेताळ झोपडपट्टीत पोलिसांचे वाहन घुसले आणि बबऱ्या भोसलेच्या घराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेढा घातला. बबऱ्या भोसले झोपेत होता. घरात पत्नी आणि बबऱ्या हे दोघेच होते. दारावर पोलिसांची थाप पडताच बबऱ्या झोपेतून उठला आणि दार काढतानाच त्याच्या मनात पाल चुकचुकली...कोण आहे? असे म्हणताच बाहेरुन पोलिसी आवाज त्याच्या कानावर पडला अन् त्याला घामच फुटला. मात्र, पळून कसे जाणार...तारुण्यातील ती मस्ती आता वयाच्या ५८ व्यावर्षी त्याच्या अंगात उरली नव्हती. दार काढल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अन् पत्नीच्या चेहऱ्यावर चिंता वाढली.