टेक्नोक्राफ्ट ग्रुपची ४० एकर जागेत ३५० कोटींची गुंतवणूक, बिडकीन येथील फॅक्टरीचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 18:31 IST2024-08-17T18:30:49+5:302024-08-17T18:31:04+5:30
टेक्नोक्राफ्ट ग्रुपच्या या गुंतवणुकीने एक हजार लोकांना मिळेल रोजगार

टेक्नोक्राफ्ट ग्रुपची ४० एकर जागेत ३५० कोटींची गुंतवणूक, बिडकीन येथील फॅक्टरीचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक आणि बांधकाम उत्पादनांचे जागतिक उत्पादक असलेल्या टेक्नोक्राफ्ट एक्सट्रूजन प्रा. लि. कंपनीच्या बिडकीन येथे ऑरिक वसाहतीलगत ४० एकर जागेत ३५० कोटी रुपयाची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचे राज्याचे माजी उद्योगमंत्री आणि लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, टेक्नोक्राफ्ट समूहाचे संचालक शरद सराफ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मिश्रा, नाथ ग्रुपचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल, माछर इंडस्ट्रीजचे संचालक रवी माछर तसेच सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, उपाध्यक्ष उत्सव माछर, मानद सचिव अथर्वेशराज नंदावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘टेक्नोक्राफ्ट’च्या गुंतवणुकीसाठी ‘सीएमआयए’च्या वतीने मोठा पाठपुरावा करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून स्थानिक समुदायासाठी कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन २८ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते, आणि आता प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक केंद्रस्थानी असलेल्या ऑरिक, बिडकीनच्यासमोर असलेल्या कंपनीच्या प्लांटच्या माध्यमातून निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमतांचा लक्षणीय विस्तार होण्यास मदत होणार आहे.
याबद्दल माहिती सांगताना ग्रुपचे संचालक शरद सराफ म्हणाले की, नवीन प्लांट सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हा विस्तार आमची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या आणि आमच्या ग्राहकांना कार्यक्षमतेने सेवा देण्याची आमची क्षमता वाढवण्याच्या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांशी संरेखित करतो. या नवीन गुंतवणुकीमुळे आम्हाला स्थानिक आणि जागतिक ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करता येतील आणि मेक इन इंडिया उपक्रमाला आणखी चालना मिळेल.
यांनी केले प्रयत्न
सीएमआयएचे माजी अध्यक्ष आणि सीएमआयएचे वरिष्ठ सदस्य नरेंद्र गुप्ता, रवी माछर, नंदकिशोर कागलीवाल आणि राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांमुळेच ही गुंतवणूक शक्य झाली. छत्रपती संभाजीनगरला ही गुंतवणूक मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांबद्दल आणि पुढाकाराबद्दल सीएमआयएच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.