‘पेट’ला ३५०० विद्यार्थ्यांची दांडी
By Admin | Published: September 29, 2014 12:59 AM2014-09-29T00:59:35+5:302014-09-29T01:00:17+5:30
औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली.
औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शहरातील १७ केंद्रांवर ‘पेट’साठी परीक्षार्थींची आसन व्यवस्था केलेली होती. एकूण ५३ विषयांसाठी ९ हजार २३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी आज प्रत्यक्षात ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल ४० टक्के (३,४११) विद्यार्थी अनुपस्थित होते.
सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान ‘पेट’चा पहिला पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य होता. दुपारी २.३० ते ४.३० वाजेदरम्यान संबंधित विषयांचे पेपर झाले. परीक्षेच्या सर्व केंद्रांवर कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, समन्वयक डॉ. माधव सोनटक्के, डॉ. सचिन देशमुख यांनी भेट दिली. परीक्षेसाठी विद्यापीठाने २० निरीक्षकांची नेमणूक केलेली होती.
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेतल्यानंतर त्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली. विद्यापीठाने ‘ओएमआर’पद्धतीच्या उत्तरपत्रिका वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ कार्बन कॉपी देणे शक्य झाले.
उद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर या परीक्षेची ‘अन्सर की’ टाकली जाईल. त्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना आपणास किती गुण मिळतील हे समजेल. येत्या ५ दिवसांच्या आत या परीक्षेचा निकाल जाहीर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.