३५00 शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:35 AM2018-05-29T01:35:39+5:302018-05-29T01:36:07+5:30
जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे बदल्यांच्या आदेशाबाबत शिक्षणाधिका-यांनी दिवसभर गोपनीयता बाळगली. दुसरीकडे, बदलीचे आदेश घेण्यासाठी सकाळपासून हजारो शिक्षकांनी जि. प. शिक्षण विभाग, सर्व पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर गर्दी केली होती. अखेर बदलीच्या आदेशाविनाच सायंकाळी शिक्षकांना घराकडे परतावे लागले.
गेल्या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्यात बदल्या नकोत म्हणून नोव्हेंबरमध्ये बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर जानेवारीपासूनच नव्याने बदल्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षकांमध्ये अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र, असा वाद उफाळून आला. यामध्ये शिक्षकांचे बदली हवी- बदली नको, असे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या दोन्ही गटांनी राज्यभर मोर्चे काढून शक्तिप्रदर्शनही केले. असे असले तरी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काहीही झाले, तरी यंदा बदल्या करणारच, असा पवित्रा घेतला आणि आज अखेर औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत सुमारे ३ हजार ५०० शिक्षकांचे बदली आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या ई-मेलवर येऊन धडकले.
हजारो शिक्षकांची बदल्यांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या शासकीय कामकाजानिमित्त दोन दिवसांपासून दिल्ली येथे आहेत. त्यामुळे शिक्षणाधिका-यांना आज सोमवारी सायंकाळपर्यंत बदल्यांसाठी त्यांची मान्यता घेता आली नाही. त्यामुळे सकाळपासून बदली आदेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा हिरमोड झाला. दरम्यान, ‘सीईओ’ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सकाळीच १५ ते २० कर्मचारी- अधिका-यांच्या पथकासह अज्ञातस्थळ गाठले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हिंदी विद्यालयात संपूर्ण पथकाने दिवसभर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदली आदेशाच्या चार- चार प्रती डाऊनलोड केल्या. त्यावेळी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी स्वत:चा मोबाईल दिवसभर बंद करून ठेवला होता. सोबतच्या कर्मचा-यांनाही बदल्यांसंबंधी गोपनीयता बाळगण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे बदली झाली खरी; पण कोणत्या शाळेवर झाली. पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा मिळाला की नाही, बदल्यांमुळे कोणते व किती शिक्षक विस्थापित झाले, हे शिक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न दिवसभर अनुत्तरितच राहिले.
शिक्षकाने बदलीसाठी २० शाळांचे पर्याय दिल्यानंतर त्यापैकी एकाही शाळेवर त्याची बदली झाली नाही. मात्र, त्याच्या जागेवर बदलीने दुसरा शिक्षक आल्यामुळे तो विस्थापित झाला आहे. आजच्या या बदली आदेशामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक शिक्षक विस्थापित झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
४विस्थापित शिक्षकांना संवर्ग-५ अंतर्गत पुन्हा २० शाळांचे पर्याय दिले जाणार आहेत. उद्यापासून पोर्टलवर लगेच विस्थापित शिक्षकांना आॅनलाईन पर्याय देता येतील. त्यानंतरही त्यांना दिलेल्या २० पर्यायांपैकी एकही शाळा मिळाली नाही, तर मग शिक्षण विभाग त्या शिक्षकाची कोणत्याही शाळेत रिक्त जागेवर बदली करणार आहे.