Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 12:02 PM2021-12-31T12:02:15+5:302021-12-31T12:10:07+5:30

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे.

35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia | Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा ( Waqf land Scam in Marathwada) केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे (35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia). बीडमध्ये ४०९ एकर जमीन हडपण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागात वक्फची ५५ हजार एकरच्या आसपास जमीन असल्याचा अंदाज आहे.

वक्फच्या जमिनींची नोंद सातबाऱ्यात येण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र वक्फकडून जाेपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याची महसुली नोंद होत नाही. त्यामुळे वक्फ आणि महसूल यांच्या ‘मिलीभगत’ने या जमिनी हडपल्या जात असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात वक्फच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यात थोड्या-अधिक प्रमाणात आहेत. औरंगाबादमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणच्या वक्फच्या जमिनींवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबत आजवर कोणताही सर्व्हे बोर्डाने केलेला नाही. मनुष्यबळ, पैसा, अधिकारांची वानवा असल्याने बोर्डाचे घोडे अडलेले आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जमिनी हडपल्या जात आहेत.

मध्यंतरी वक्फच्या सीईओंनी महसूल विभागाला पत्र दिले होते. महसूलमधील यंत्रणेला हाताशी धरून जमिनी हडपल्या जात आहेत, असा सूर त्यांनी पत्रातून आळविला होता. त्या पत्रावरून महसूल प्रशासनात प्रचंड वादळ उठले असले तरी बीडमधील तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सीईओंच्या पत्रात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

वक्फच्या जमिनींची लवकरच पाहणी
जमिनींची लवकरच पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर किती जमिनी हडपल्या गेल्या, त्याची माहिती समोर येईल. राज्यात ९७ हजार एकर जमीन आहे. त्यातील सुमारे ७० टक्के जमीन अतिक्रमित झाल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डातील काही जणांना हाताशी धरूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. जमिनी सांभाळण्याचे आव्हान आहे. कर्मचारीवर्ग, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत.
-अनिस शेख, सीईओ वक्फ बोर्ड औरंगाबाद.

Web Title: 35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.