३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:27 PM2017-11-14T23:27:17+5:302017-11-14T23:27:29+5:30
जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले
जालना : जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले. यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक कृषिसेवा केंद्रांवर कीटकनाशक विक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.
यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते व शेतक-यांच्या कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या अभियानामध्ये कृषिसेवा केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीच्या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषिविकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्ह्यातील कृषि केंद्रांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये सुमारे १२०० कृषी केंद्रांतील कीटकनाशके, खरेदी-विक्रीच्या नोंदवह्या, दर फलक, अतिजहाल कीटकनाशके यांची तपासणी करण्यात आली. पैकी पाचशे दुकाने वर्षभर तर अन्य दुकाने खरीप हंगामात सुरू राहणारी आहेत. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने तब्बल ३६ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भोकरदन, अंबड आणि जालना येथील कृषीकेंद्रांची संख्या अधिक आहे. बदनापूर आणि परतूर तालुक्यातील कृषिकेंद्रांवर कीटकनाशक विक्री नियमांची बºयापैकी अंमलबजावणी होत असल्याने या तालुक्यांतील एकाही केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
-------------
५० कृषिकेंद्र चालकांना नोटिसा
तपासणीमध्ये कृषी विभागाने विषारी, अतिविषारी कीटकनाशकांचा साठा तपासला . यात कीटकनाशकांच्या बाटलीवरील लाल रंगाचा त्रिकोण असलेल्या प्रतिबंधित अतिजहाल कीटकनाशकांचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० कृषिसेवा केंद्रांना आपला परवाना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली असून, कीटकनाशक विक्रीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे.