२४ तासांत ३६ वेळा रेल्वेची येजा; शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूककोंडी, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:38 PM2021-11-26T13:38:32+5:302021-11-26T13:40:42+5:30
बीड बायपास, देवळाई, बाळापूर परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात ये-जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वाधिक वर्दळीचे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे.
बीड बायपास, देवळाई, बाळापूर परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात ये-जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. नागरिकांना शिवाजीनगर रेल्वेफाटक ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. रेल्वे आली की, प्रत्येकवेळी रेल्वेफाटक बंद केले जाते. फाटक बंद होताच शिवाजीनगरात वाहनचालकांच्या रांगा वाणी मंगल कार्यालयापर्यंत येतात. तर दुसऱ्या बाजूला देवळाई चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेषत: सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या कालावधीत या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. या रांगेतून पुढे जाण्यासाठी काही वाहनचालकनियम पाळत नाही. अशावेळी वाहतूककोंडी निर्माण होते. बऱ्याचदा रेल्वे गाडीचे फाटक बंद होत असल्याचे समजताच देवळाई चौकातील वाहतूक पोलीस फाटकाजवळ येतात आणि वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करतात. पावसाळा समाप्त झाल्यापासून देवळाई चौक ते शिवाजीनगर रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे अनेक दुकानदारांनी त्यांची दुकाने दुसरीकडे स्थलांतरित केली आहेत. मसाले आणि ड्रायफ्रुट विक्रेता मोगल यांनी सांगितले की, येथे तातडीने भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. हे काम झाल्याशिवाय आमचा त्रास कमी होणार नाही.
वाहनचालकांची फाटकाखालून घुसखोरी
रेल्वेफाटक लागल्यानंतरही अनेक वाहनचालक फाटकाखालून त्यांचे वाहन टाकतात, रेल्वेरूळ ओलांडताना जीव धोक्यात टाकतात, असे रेल्वेचे कर्मचारी रामेश्वर जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले की, नागरिक खूप घाई करतात. आजही एका महिलेची मोपेड अडकून पडली होती. तेव्हा त्या घाबरल्या होत्या. मात्र, नागरिकांनी त्यांना मदत केल्याने त्यांना त्यांचे वाहन फाटकाखालून बाहेर काढता आले.