नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर
By मुजीब देवणीकर | Published: February 22, 2024 12:10 PM2024-02-22T12:10:17+5:302024-02-22T12:15:01+5:30
महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून मालमत्तांना भाडे मूल्याधारित कर (रेंटल व्हॅल्यू बेसड् टॅक्स) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला आर्थिकरीत्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर द्यावा लागणार आहे. ५० बेडपेक्षा मोठ्या हॉस्पिटलला सात हजार ३०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मेडिकल वेस्टशिवाय अन्य कचरा जमा करण्यासाठी हे शुल्क लावण्यात येत आहे.
महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून मालमत्तांना भाडे मूल्याधारित कर (रेंटल व्हॅल्यू बेसड् टॅक्स) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त नव्याने कर लागणाऱ्या मालमत्तांसाठी असून, अंमलबजावणी एक एप्रिलपासून केली जाणार आहे. नव्या दरानुसार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना ५ हजार ९४१ रुपये तर तेवढ्याच क्षेत्रफळाच्या व्यावसायिक मालमत्तांना आता ३१ हजार ९२४ रुपये आकारला जाईल. ही करवाढ करताना जुन्या मालमत्तांना दिलासा देण्यात आला असला तरी यंदापासून महापालिका उपभोक्ता कराची अंमलबजावणी करणार आहे. उपभोक्ता कर लावण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतलेला आहे, पण व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहता त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सुमारे अडीच लाख मालमत्ताधारकांना ३६५ रुपये जास्तीचा कर भरावा लागणार आहे.
धनादेश वटला नाही तर दंड
महापालिकेला मालमत्ताधारकाने दिलेला धनादेश वटला नाही, तर रकमेच्या आधारावर दंड आकारला जात होता. पण यापुढे सरसकट पाच हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एखाद्याने दिलेले दोन हजारांचा धनादेश वटला नाही तर पाच हजार दंडासह नंतर त्यांना सात हजार रुपये द्यावे लागतील. सोबतच १३८ ची कारवाईदेखील होईल. धनादेशावर खाडाखोड असल्यास कर्मचाऱ्यावर दोनशे रुपये दंडात्मक कारवाई होईल.