‘लोकमत’चा ३६ वा वर्धापन दिन सोहळा : शुभेच्छांनी दुणावला ऋणानुबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:32 AM2018-01-10T01:32:18+5:302018-01-10T01:33:18+5:30
महाराष्ट्राचा मानबिंदू आणि मराठवाड्याच्या मातीचा श्वास व जनमानसाचा हुंकार झालेल्या ‘लोकमत’वर वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि मराठवाड्याच्या मातीचा श्वास व जनमानसाचा हुंकार झालेल्या ‘लोकमत’वर वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. ३६ वर्षांच्या वाटचालीत जुळलेल्या ऋणानुबंधांच्या गाठी या स्नेहसोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा घट्ट झाल्या. सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्वसामान्य वाचक-चाहत्यांनी बोचºया थंडीत हजारोंच्या संख्येने लोकमत भवनात उत्स्फूर्तपणे येऊन व्यक्त केलेल्या प्रेमाची ऊब घेत ‘लोकमत’ने दिमाखात ३७ व्या वर्षात पदार्पण केले.
‘लोकमत’चा वर्धापन दिन ही तशी शहरवासीयांसाठी कायमच पर्वणी ठरते. मंगळवारी साजºया झालेल्या ३६ व्या वर्धापनदिनीही स्नेहीजनांची मांदियाळी तब्बल पाच तास रंगली. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला हा शुभेच्छा व भेटीगाठींचा सिलसिला रात्री १० वाजले तरी संपला नव्हता. पुष्पगुच्छ नको, असे आवाहन करूनही हितचिंतकांनी सुंदर-सुंदर पुष्पगुच्छ आणत आग्रहाने ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा यांचा सत्कार करीत ‘लोकमत’च्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरारलेल्या हिरव्याकंच वृक्षवेलींचे सौंदर्य अधिकच खुलविणाºया विद्युत दिव्यांच्या लडी, लाल गलिच्यावरून चालत आल्हाददायक भव्य मंडपात आलेले पाहुणे सुमधुर संगीताची धून कानी पडून सुखावत होते. प्रसन्नचित्त पाहुण्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, संपादक चक्रधर दळवी, सहउपाध्यक्ष संदीप विश्नोई आणि ‘लोकमत परिवारा’तर्फे उत्स्फूर्तपणे केले जात होते.
मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न व जिद्दीने मार्गस्थ झालेल्या तमाम जनतेच्या खांद्याला खांदा भिडवून ‘लोकमत’ सातत्याने येथील जनतेचा आवाज बनला. प्रसंगी संघर्षात सामील झाला. ‘लोकमत’च्या या सामाजिक (पान २ वर)
यांनीही दिल्या शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड आदी मान्यवर विविध कामांमुळे शहराबाहेर होते. त्यामुळे त्यांनी फोन करून आपले शुभसंदेश कळवून ‘लोकमत परिवारा’स शुभेच्छा दिल्या. यासह अनेक मान्यवरांनीही दिवसभर फोनवरून संपर्क साधून शुभेछा देत ‘लोकमत’प्रती असलेला स्नेहाचा ओलावा जपला. शुभेच्छांच्या वर्षावामुळे दिवसभर ‘लोकमत’चे फोन खणखणत होते.
‘लोकमत’ची हाक - नागरिकांची साद
यंदा ‘लोकमत’ने वर्धापन दिनाची छापील निमंत्रणपत्रिका काढली नाही. त्यामुळे वृत्तपत्र व विविध सामाजिक माध्यमातून ३६ व्या वर्धापन दिनाचे निमंत्रण शहरवासीयांना हस्ते परहस्तेच मिळाले; परंतु ‘लोकमत’ने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी उपस्थित राहून सोहळ्याची शान वाढविली.