औरंगाबाद मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात; ३ ईव्हीएममुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन
By विकास राऊत | Published: April 30, 2024 12:13 PM2024-04-30T12:13:08+5:302024-04-30T12:14:18+5:30
आता रणधुमाळी सुरू, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. छाननीअंती ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप केल्यानंतर निवडणूक मैदानात ‘नोटा’सह ३८ उमेदवार रिंगणात असतील, असे नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना स्वामी यांनी सांगितले, उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार असून, प्रशासनाने तयारी केली आहे. दुपारी २:४५ वाजता शेवटचा उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आला. जबरदस्तीचा प्रकार कुठेही घडला नाही. स्वत: उमेदवार माघार घेण्यासाठी आले होते. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे राखीव असलेले चिन्ह त्यांना देण्यात आले. नोंदणीकृत पक्षांना त्यांचे चिन्ह दिले. काही उमेदवारांना सोडत काढून चिन्ह देण्यात आले. दरम्यान, ‘नोटा’सह ३८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते.
दररोज १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत जावे लागणार
११ मेरोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. ३० एप्रिलपासून १२ दिवस प्रचारासाठी उरले आहेत. मैदानात असलेल्या उमेदवारांना रोज किमान १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागेल.
कोणत्या चिन्हासाठी लागली स्पर्धा
ॲाटो रिक्षा, कपाट, रोड रोलर या चिन्हांसाठी सर्वाधिक मागणी होती. सोडतीला लहानगा न भेटल्यामुळे मीच डोळे बंद करून चिन्हाची चिठ्ठी काढली. तुतारी हे चिन्ह देखील उमेदवाराला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी नमूद केले.
निकाल उशिरा लागणार
१३ मेरोजी मतदान झाल्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवार जास्त असल्यामुळे ३८ वेळा बॅलेट युनिटचा बझर वाजेल. फेऱ्यांची संख्या वाढेल. मॉकपोल ३८ वेळा करावे लागेल, असे स्वामी म्हणाले.
बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात
२९ रोजी सायंकाळी सात वाजेनंतर बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात केली. लष्करातील सैनिकांसह हर्सूल कारागृहातील आरोपी, घरून मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जाणार आहे.
६ हजार १२० ईव्हीएम लागणार...
६ हजार १२० ईव्हीएम औरंगाबाद मतदारसंघात लागणार आहेत. तर जालना मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रात ३१३५ ईव्हीएम लागणार आहेत.
मैदानातील उमेदवार.................................पक्ष
चंद्रकांत भाऊराव खैरे................. उद्धवसेना
संदीपान आसाराम भुमरे................ शिंदेसेना
सय्यद इम्तियाज जलील................ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
संजय उत्तमराव जगताप...................बहुजन समाज पार्टी
हर्षवर्धन रायभान जाधव..................अपक्ष
मनीषा खरात............................... बहुजन महाराष्ट्र पार्टी
सुरेश आसाराम फुलारे........................ अपक्ष
खाजा कासीम शेख......................... अपक्ष
बबनगीर उत्तमगीर गोसावी............... हिंदुस्थान जनता पार्टी
देविदास रतन कसबे....................... अपक्ष
जगन्नाथ किसन उगले..................... अपक्ष
अरविंद किसनराव कांबळे.................. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख............ अपक्ष
रवींद्र भास्करराव बोडखे.....................भारतीय युवा जन एकता पार्टी
संजय भास्कर शिरसाट..................... अपक्ष
सुरेंद्र दिगंबर गजभारे............................अपक्ष
प्रतीक्षा प्रशांत चव्हाण...................... आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष
जगन्नाथ खंडेराव जाधव...................... अपक्ष
वसंत संभाजी भालेराव.....................प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
पंचशीला बाबूलाल जाधव................ रिपब्लिकन बहुजन सेना
संगीता गणेश जाधव...................... अपक्ष
नितीन पुंडलिक घुगे............................ अपक्ष
नारायण उत्तम जाधव........................पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
मीनासिंग अवधेशसिंग सिंग.................. अपक्ष
प्रशांत पुंडलिकराव आव्हाळे..................अपक्ष
मधुकर पद्माकर त्रिभुवन...................... अपक्ष
मनोज विनायकराव घोडके................. अपक्ष
डॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत....................अपक्ष
भरत पुरुषोत्तम कदम............................ राष्ट्रीय मराठा पार्टी
अर्जुन भगवानराव गालफाडे........................ राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
संदीप देविदास जाधव............................ अपक्ष
लतीफ जब्बार खान.......................... अपक्ष
संदीप दादाराव मानकर......................अपक्ष
अब्दुल समद बागवान......................... एआयएमआयएम (आयएनक्यू)
भानुदास रामदास सरोदे ................... अपक्ष
मैदानातून माघार घेतलेले उमेदवार...
विश्वास पंडित म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
किरण सखाराम बर्डे, अपक्ष
खान एजाज अहमद, अपक्ष
गोरखनाथ राजपूत राठोड, अपक्ष
जियाउल्लाह अकबर शेख, अपक्ष
मोहम्मद नसीम शेख, अपक्ष
साहेबखान यासिनखान पठाण, अपक्ष