महापालिका वॉर्ड रचनेवर ३७० आक्षेप; शनिवारी होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 07:21 PM2020-02-13T19:21:00+5:302020-02-13T19:22:38+5:30
निवडणूक आयोगाने दिलेले निकष पायदळी तुडवीत प्रारूप आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप
औरंगाबाद : महापालिकेने तयार केलेल्या वॉर्ड रचनेवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड टीकेची झोड उठविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेले निकष पायदळी तुडवीत प्रारूप आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. आराखडा आणि सोडतीवर मनपाकडे ३७० आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांवर शनिवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. साखर आयुक्त सौरभ राव यांची आयोगाने नियुक्ती केली आहे.
शनिवारी सकाळी १० वाजेपासून मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणीला सुरुवात होईल. ज्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आक्षेप दाखल केले आहेत, ते सुनावणीस उपस्थित राहणार आहेत. सातारा-देवळाई भागातील पाच वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी सर्वाधिक आक्षेप दाखल केले आहेत. महापालिकेने आरक्षण टाकताना रोटेशन पद्धतीचा अनेक ठिकाणी सोयीनुसार वापर केल्याचे आक्षेपही आहेत. काही वॉर्ड खुल्या प्रवर्गात आणण्यासाठी तर काही वॉर्ड राखीव करण्यासाठी चक्क प्रगणक गटांची हेराफेरी केल्याचे आक्षेपात म्हटले आहे. एकूण ११५ पैकी ६८ वॉर्डांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत.
विभागप्रमुख रुग्णालयात
महापालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक विभागप्रमुख कमलाकर फड आजारी असल्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपचार सुरू असल्याने ते निवडणुकीच्या सुनावणीस उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.