नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:10 PM2024-07-31T20:10:31+5:302024-07-31T20:10:55+5:30
मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे.
छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकायचा आहे. ही रक्कम राज्याकडून अनुदान स्वरूपात मिळावी, यासाठी मनपाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, केंद्र शासनाने १३७ कोटी २४ लाख ४९ हजार ९८० रुपये तर राज्य शासनाचे २४६ कोटी ९८ लाख २० रुपये असे एकूण ३८४ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये सोमवारी संध्याकाळी मनपाच्या खात्यात जमा केले. त्यामुळे आणखी काही महिने योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे. त्यामुळे अनुदान स्वरूपात रक्कम मिळावी, अशी मागणी शासनाकडे केली. मंत्रिमंडळ बैठकीसमोर योजनेच्या कामाचे व्हिडीओ चित्रीकरण सादर केले जाईल. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून १४२४ कोटी १७ लाख रुपये आले. त्यातील १४१५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
-योजनेचा एकूण खर्च -२७४० कोटी रुपये
-केंद्र शासन हिस्सा: २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)
-राज्य शासन हिस्सा: ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख) -महापालिकेचा हिस्सा: ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)
केंद्र शासनाने हिश्यातील ५०८ कोटी ४७ लाख व राज्य शासनाने ९१५ कोटी ६९ लाख रुपये निधी दिलेला आहे. मनपाने वाटा टाकलेला नाही.
शासन.......एकूण हिस्सा.....दिलेला निधी.....प्रलंबित निधी (आकडे कोटीत)
केंद्र.............६८५................६४६.............३९
राज्य.......१२३३...................११६१.............७२
मनपा........८२२...................०.००..............८२२.