३९४ प्रस्ताव धूळ खात
By Admin | Published: July 15, 2017 11:44 PM2017-07-15T23:44:03+5:302017-07-15T23:45:41+5:30
मानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला. या अंतर्गत व्हॅर्मी कंपोस्टींग आणि नाडेफ कंपोस्टींगसाठी ३९४ प्रस्ताव मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाखल केले. मात्र अजूनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही.
मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कुशल रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच शाश्वत संसाधनाची निर्मिती करणे, या कारणामुळे ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे, सिंचन विहीर, शेततळे, फळबाग, गांडूळ खत, नाडेप खत, शोषखड्डे, रोपवाटिका, वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश करुन राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना २०१६-१७ पासून प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतस्तरावर आणि यंत्रणा स्तरावर कामाचे नियोजन विभागीय आयुक्तांनी ठरवून दिले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली छाननी समिती रद्द केली. मानवत तालुक्यात कृषी विभागामार्फत फळबाग, गांडूळखत, नाडेप प्रकल्पासाठी १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत लाभार्थ्याची निवड करुन हे प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्यात आले. गांडूळ आणि नाडेपसाठी तब्बल ८०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले. तर फळबाग लागवडीसाठी ५०० प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र कृषी विभागाला मनरेगाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत स्वारस्य नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ११ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष कार्यक्रम मार्च महिन्यात राबविला. असे असले तरी कृषी विभागाकडून मात्र सार्वजनिक कामे करण्यात आली नाहीत. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या कामांनाही मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत.