४ कोटी ३३ लाखांचे एलईडी साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:05 PM2019-05-20T23:05:40+5:302019-05-20T23:06:08+5:30
शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे नवीन साहित्य जळून खाक झाले.
औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे नवीन साहित्य जळून खाक झाले. गोदामाला आग लागली नसून, लावण्यात आल्याचेही प्राथमिक चौकशीत निष्पन्न होत आहे. कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले.
इलेक्ट्रॉन एनर्जी प्रा.लि. या कंपनीने शहरात ४० हजार पथदिव्यांचे काम घेतले आहे. या कामासाठी कंपनीने सर्वोेच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाला एका रात्रीतून कंपनीला वर्कआॅर्डर द्यावी लागली होती. १२० कोटींचा हा प्रकल्प असून, यामध्ये कंपनीला शहरातील संपूर्ण पथदिव्यांची केबल बदलणे, जंक्शन बॉक्स उभारणी, नवीन १,२०० पोल उभे करणे, विजेची बचत, १० वर्षे संपूर्ण प्रकल्पाची देखभाल करणे आदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून कंपनी जोमाने काम करीत आहे. आतापर्यंत २७ हजार नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले. अनेक ठिकाणी केबल टाकण्यात आली. जंक्शन बॉक्स उभारणीचे काम सुरू आहे. या सर्व कामांसाठी कंपनीने एमआयडीसी चिकलठाणा येथे गोडाऊन उभारले आहे. गोडाऊनमध्ये फिटिंग बॉक्स, केबल, जंक्शन बॉक्स, प्लास्टिकपाईप आदी साहित्य ठेवले होते. रविवारी दुपारी अचानक गोडाऊनला आग लागली. या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आज आग विझल्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत बारकाईने तपासणी केली असता ४ कोटी ३३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.
संशय बळावला
गोडाऊनच्या दर्शनी भागात सुरक्षारक्षक कक्षामागे अगोदर आग लावण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ही आग कोणी आणि कशी लावली हे लक्षात येत नाही. कंपनीने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले. फुटेजमध्ये काही व्यक्ती संशयित दिसून येत आहेत.