मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:27+5:302021-09-13T04:04:27+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ धरणांमध्ये १०० टक्के पाणी आले आहे, तर जायकवाडी धरणात ५६ टक्के जलसाठा असून खडका बंधारा ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ धरणांमध्ये १०० टक्के पाणी आले आहे, तर जायकवाडी धरणात ५६ टक्के जलसाठा असून खडका बंधारा १०० टक्के भरल्याने तो आता ओसांडून वाहात आहे.
सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे. सर्व प्रकल्प आणि बंधाऱ्यांत १२ सप्टेंबरपर्यंत ४ हजार १७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आला आहे. मागील वर्षी ४ हजार ५५८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा विभागात होता. त्यात सध्या ५४१ दशलक्ष घनमीटर इतकी तूट आहे. निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, पेनगंगा, निम्न तेरणा हे प्रकल्प १०० टक्क्यांच्या वाटेवर आहेत. प्रकल्पांत समाधानकारक पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जायकवाडी धरणात १२०१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. नाशिककडून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जायकवाडी आजच्या तारखेपर्यंत तुडुंब भरले होते.
मोठ्या प्रकल्प, बंधाऱ्यांतील जलसाठा
जायकवाडी ५६ टक्के,
निम्न दुधना ९७ टक्के,
येलदरी १०० टक्के,
सिध्देश्वर १०० टक्के,
मालजगांव ९४ टक्के,
मांजरा ८६ टक्के,
पेनगंगा ९८ टक्के,
मानार १०० टक्के,
निम्न तेरणा ७३ टक्के,
विष्णुपुरीत १०० टक्के
सिना कोळेगांव २१ टक्के
शहागड बंधारा ४६ टक्के
खडका बंधारा १०० टक्के