जिल्ह्यात ४ लाखांपर्यंत लोक दारिद्र्यरेषेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:04 AM2021-07-31T04:04:56+5:302021-07-31T04:04:56+5:30
स.स़ो.खंडाळकर औरंगाबाद : २००१ नंतर जुने कार्ड जीर्ण होऊन फाटायला आले, तरी नवे रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले ...
स.स़ो.खंडाळकर
औरंगाबाद : २००१ नंतर जुने कार्ड जीर्ण होऊन फाटायला आले, तरी नवे रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणे कठीण झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा १९९७ पासून आढावाच घेण्यात आलेला नाही किंवा सर्वेक्षणही केलेले नाही. त्यामुळे समाजातील खरे गरीब कोण व श्रीमंत कोण, हेच कळेनासे झाले आहे. कार तसेच बाईकवर येऊन ‘बीपीएल’साठी रेशनकार्डवर असलेला माल घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्यांच्या घरी टीव्ही, फ्रीज आहेत, असेही बोगस ‘बीपीएल’वाले आहेत. ते शोधून बाजूला काढण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील रेशन कार्डांची संख्या- ७ लाख ४५ हजार ७१६
शहर व जिल्हा मिळून बीपीएल कार्डधारक-१ लाख ७७ हजार ३७१
अंत्योदय कार्डधारक-६९ हजार ६३९
केसरी कार्डधारक-५लाख १७ हजार ९३९
अन्नपूर्णा कार्डधारक-२ हजार ९९
पांढरे कार्डधारक-११ हजार ७८६
कोणत्या तालुक्यात किती दारिद्रयरेषेखालील कार्डधारक
औरंगाबाद शहर- ५२ हजार ३४२
औरंगाबाद तालुका- ९ हजार ३४५
फुलंब्री- ७ हजार २६३
पैठण- २० हजार ५४५
सिल्लोड-१७ हजार २४६
कन्नड-२५ हजार ९४७
सोयगाव-४ हजार ५२५
वैजापूर-१८ हजार ५५१
गंगापूर-२० हजार ६२४
खुलताबाद-१ हजार ४३
................
दारिद्र्यरेषेचे निकष काय?
बीपीएलसाठी ३९ हजार रुपये एवढी उत्पन्नाची अट आहे.
अंत्योदयसाठी २२ हजार इतकी उत्पन्नाची अट आहे
१ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना केसरी कार्ड मिळते.
ज्यांच्याकडे टीव्ही, फ्रिज, कार नाही ते ‘बीपीएल’मध्ये मोडतात.
...............
आता फक्त गहू- तांदूळच...
रेशन दुकानांवर हल्ली फक्त गहू- तांदूळच मिळते. २०१४ पूर्वी डालडा, साखर, रवा, मैदा, गोडे तेल आणि रॉकेल मिळायचे. आता यातले काहीच मिळत नाही.
.............
नियतन वेळेवर मिळत नाही....
रेशन दुकानदारांना नियतन वेळेवर मिळत नाही. दर महिन्याच्या एक तारखेला नियतन मिळाल्यास रेशन दुकानदार ग्राहकांची महिनाभर सेवा करू शकतील; परंतु असे होत नाही. नियतन कधी दहा तारखेला, तर कधी पंधरा तारखेला प्राप्त होते. त्यामुळे कार्डधारकांना तेवढीच सेवा मिळते.
- डी. एन. पाटील, अध्यक्ष- स्वस्त धान्य दुकानदार महासंघ.
................
माझ्याकडे प्रभार......
जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा माझ्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. वर्षाराणी भोसले जानेवारीपर्यंत रजेवर आहेत. नियमानुसार पुरवठा विभागाचे काम सुरू आहे. गहू आणि तांदळाचे नियतनही वेळेवर दिले जाते.
- दत्ता भारस्कर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी