मित्राचा खून करणाऱ्या जायभायेला ४ पर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:57 PM2018-03-29T23:57:45+5:302018-03-30T11:02:54+5:30
कारखाली मित्राला चिरडून त्याचा खून करणारा आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये याचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी सात दिवस वाढला आहे. न्यायालयाने आरोपी संकेतला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कारखाली मित्राला चिरडून त्याचा खून करणारा आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये याचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी सात दिवस वाढला आहे. न्यायालयाने आरोपी संकेतला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले.
सिडको एन-२, कामगार चौक ते महालक्ष्मी चौकादरम्यान मित्राला कारखाली वारंवार चिरडून त्याचा निर्घृण खून करणा-या आरोपी संकेत जायभायेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांनी आज गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरून संकेत कुलकर्णी (१८) या मित्राला कारखाली चिरडून आरोपी संकेत जायभायेने २४ मार्च रोजी त्याचा खून केला. तसेच त्याच्या अन्य दोन मित्रांनाही कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक हारुण शेख यांनी आरोपी संकेतला आज न्यायालयासमोर हजर केले. आरोपीने त्याच्या मोबाईलमधील सीमकार्ड गायब केले आहे. शिवाय तो त्याच्यासोबत असलेल्या मित्रांचे मोबाईल नंबरही पोलिसांना देत नाही. तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
आरोपी संकेतचा खून करीत असताना त्याच्यासोबत कारमध्ये असलेले आरोपी विजय जौक, उमर पटेल आणि संकेत मचे, हे पसार आहेत. पसार आरोपी आणि आरोपी संकेत यांच्यात या हत्येविषयी कट शिजला होता का, असल्यास त्यांचा कट काय होता, याविषयी त्याच्याकडे तपास करायचा आहे. आरोपींकडून सीमकार्ड जप्त करणे असल्याने त्याला दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. आरोपीच्या वकिलांनी आरोपी संकेतला पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती न्यायालयास केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी संकेतला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.